छत्रपती संभाजीनगरमध्ये 'शिक्षक पात्रता परीक्षा' तयारी पूर्ण (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET Exam 2025) २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २४ हजार ३८५ परीक्षार्थीसाठी दोन सत्रात ३७ केंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थीना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्या व परीक्षा केंद्रावर आवश्यक सुरक्षा व अन्य व्यवस्थांची सज्जता ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित यंत्रणेला केल्या आहेत. परीक्षेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता सुजाता भालेराव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. भागिरथी पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक पात्रता परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ३७ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळचे सत्र सकाळी साडेदहा ते दुपारी १ व दुपारचे सत्र दुपारी अडीच ते सायं. ५ अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे.
| तपशील | माहिती |
| परीक्षेची तारीख | २३ नोव्हेंबर २०२५ |
| एकूण परीक्षार्थी | २४,३८५ |
| परीक्षा केंद्रे | ३७ केंद्रे |
| सकाळचे सत्र | स. १०:३० ते दु. १:०० (११,१३४ परीक्षार्थी) |
| दुपारचे सत्र | दु. २:३० ते सायं. ५:०० (१३,२५१ परीक्षार्थी) |
| माध्यम | चार माध्यमांत परीक्षा |
| नियोजन | ९ झोन (४३ केंद्रसंचालक कार्यान्वयन करतील) |
सकाळच्या सत्रात ११ हजार १३४ तर दुपारच्या सत्रात १३ हजार २५१ परीक्षार्थी परीक्षा देतील चार माध्यमांत ही परीक्षा होईल. परीक्षेच्या नियोजनासाठी ९ झोन करण्यात आले आहेत. एकूण ४३ केंद्रसंचालक या परीक्षेचे कार्यान्वयन करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. परीक्षा शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडाव्या. त्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे. सुरक्षा, सुविधांची उपलब्धता करण्यात यावी. परीक्षार्थीना प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा पुरेसा व बिनचुक पत्ता द्यावा. परीक्षार्थीची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी केल्या आहेत.






