
ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी आता 'AI' चा वापर! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा सल्ला (photo Credit- Ai)
वानखेडे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऊसाची उत्पादकता ही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. ही तफावत कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानासारख्या आधुनिक साधनांचा ऊस उत्पादन वाढीसाठी प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. ऊस पिकाच्या संशोधनासाठी अनेक नामांकित संस्था कार्यरत असून, ऊस प्रक्रिया उद्योगासाठी सहकारी व खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे ऊस पिकासाठी लागवड ते विक्रीपर्यंत मजबूत साखळी उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी विविध जैविक उत्पादने वापरून खत व औषधांवरील खर्च कमी करावा. तसेच बारामती येथील तज्ज्ञांच्या मदतीने एआय तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबवावेत, यासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षस्थानी गांधेली प्रक्षेत्राचे संचालक डॉ. के. ए. धापके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. बी. पवार (सहयोगी संचालक, एनएआरपी), प्रकाश देशमुख (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी), डॉ. एस. एच. जेधे (कृषी अधिकारी, प्रादेशिक सहसंचालक-साखर), धनश्री जाधव (प्रकल्प संचालक) तसेच डॉ. ए. के. पडिले (प्रकल्प उपसंचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा) हे उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथील तज्ज्ञ तुषार पौळ, अविनाश पांगरकर व अरुण पडुळ यांनी एआय आधारित तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.
उत्पन्न वाढवण्यास होईल मदत
उत्पादन खर्चात बचत करून उत्पादन वाढविण्याचे उपाय, स्मार्ट शेतीसाठी डिजिटल साधनांचा वापर, मोबाईल ऍप्स व सेन्सर तंत्रज्ञानाचा ऊस शेतीतील उपयोग यावरही सखोल चर्चा करण्यात आली. एआय तंत्रज्ञानामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास कशी मदत होते, याची माहिती उदाहरणांसह देण्यात आली.