Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Pune Celebration lal mahal chowk
पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… ५१ रणशिगांची ललकारी… नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा रणगजर… सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाळ पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे शिवजयंती निमित्ताने खास आयोजन करण्यात आले. यावेळी सलग १४ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
पुण्यातील शिवजयंती महोत्सव समिती तर्फेशिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी महाराजांचे बालपण गेलेल्या लालमहाल येथून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलींद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधींच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील भव्य शोभायात्रेवेळी छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचा एकीचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत. यानिमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार, मावळे यांचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता, त्यावेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. ईशान अमित गायकवाड यांनी सलग १४ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हैलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली. या हेलीकॅप्टर पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ साली ह्या स्मारकाचे अनावरण झाले होत. पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासा सारखाचा ह्या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक आहे.