
पावसाचे पाणी भरून वापरण्याची वेळ; चिपळूणमधील शाळेतील विद्यार्थिनींची दयनीय अवस्था
निसार शेख, चिपळूण: जुलै महिना उजाडताच आता पावसाने राज्यात जोरदार बँटिंगला सुरुवात केली आहे. कोकण,विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रासह खान्देशात पावसाने जोर पकडला आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चिपळूण शहरातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक पेठमाप मराठी व उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. राधाई फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा राधा लवेकर यांनी शाळेला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
राधा लवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शाळेतील काही विद्यार्थिनी पावसात भिजत कळशी आणि बादलीच्या साहाय्याने साचलेले पावसाचे पाणी बाथरूममधील ड्रममध्ये भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती घेतली असता, शाळेत दैनंदिन वापरासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भेटीदरम्यान शाळेतील आर.ओ. वॉटर प्युरिफायर पुरामुळे बंद पडल्याचेही समोर आल्याचे सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या वापरातील पाण्याची टाकी गेल्या वर्षभरापासून स्वच्छ करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे फाऊंडेशनने म्हटले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ, जीर्ण आणि गैरसोयीची असल्याचेही निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वच्छ, प्रशस्त स्वच्छतागृह आणि नियमित नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून आल्याचा आरोप राधा लवेकर यांनी केला आहे.
या संदर्भात मुख्याध्यापिकांकडे विचारणा करण्यात आली असता, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाकडे अद्याप कोणतीही अधिकृत मागणी करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राधाई फाऊंडेशनने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी, तसेच शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
RATNAGIRI: चिपळूण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी; नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी