
जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप
शहरातील प्रमुख बाजारपेठा, बसस्थानक परिसर, शासकीय कार्यालयांच्या आसपास तसेच वर्दळीच्या ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे मोडकळीस आलेली आहेत. तर अनेक ठिकाणी नागरिकांना उघड्यावर्ती लघुशंकेसाठी जावे लागत आहे. अनेक ठिकाणी स्वछतागृहांचे दरवाजे तुटलेले, पाण्याची सोय नाही, प्रकाश व्यवस्था निकृष्ट आहे तर काही ठिकाणी कचरा व सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक विशेषतः वृद्ध, लहान मुले व बाहेरून येणारे प्रवाशी प्रचंड अडचणीत सापडत आहेत.
विशेष बाब म्हणजे जत शहरात महिलांसाठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. उपलब्ध असलेली काही मोजकी महिला स्वच्छतागृहेही बंद अवस्थेत किंवा अत्यंत अस्वच्छ स्थितीत असल्याने महिलांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेमुळे आजारांचा धोका वाढत आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या गाजावाजात जत शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच दिसून येत आहे. कागदोपत्री स्वच्छतेचे अहवाल सादर केले जात असले तरी प्रत्यक्षात शहरातील स्वच्छतागृहांकडे नगरपरिषद प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. स्वच्छतागृहांच्या नियमित साफसफाईसाठी नेमलेले कर्मचारी अपुरे असल्याची तसेच देखरेखीचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर जत शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची तात्काळ दुरुस्ती करून नियमित स्वच्छता करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज महिला स्वच्छतागृह उभारावीत, अशी ठाम मागणी नागरिक, महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा नगरपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.