संग्रहित फोटो
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवल्या जाणाऱ्या निवडणुका मानल्या जात असताना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि नव्या दमाच्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा आता उघडपणे व्यक्त होत आहे. गावपातळीवर संघटन उभे करणारे, आंदोलनात पुढे राहणारे आणि निवडणुकीच्या काळात पक्षासाठी झटणारे कार्यकर्तेच या निवडणुकांचा खरा कणा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही ठराविक नेतेमंडळी आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांची पदाधिकारी म्हणून वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील असतात, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये ऐकू येत आहे. त्यामुळे घराणेशाही विरुद्ध निष्ठावंत कार्यकर्ता हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे केंद्रस्थानी येत आहे. नेतृत्वाने यंदा व्यापक विचार करून कार्यकर्त्यांच्या भावनांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या दोन पारंपारिक गटांसोबतच भाजपकडूनही संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेत असून, नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी दिल्यास मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असे मत पक्षांतर्गत वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजपची भूमिका पारंपारिक राजकारणाला कितपत आव्हान देऊ शकते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.
एकीकडे १६ तारखेपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अनेक इच्छुकांनी प्रशासनाकडून उमेदवारी अर्जांची खरेदी केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…
एकीकडे जुनी राजकीय समीकरणे, तर दुसरीकडे बदलाची अपेक्षा व्यक्त करणारा कार्यकर्ता वर्ग या दोहोंच्या संघर्षातूनच यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आकाराला येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यात ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर नेतृत्व, निष्ठा आणि नव्या संधींच्या कसोटीची ठरणार, हे मात्र निश्चित.






