पंचवटी : मालेगाव (Malegaon) शिवारातील महिलेचा (Women) किरकोळ दागिने लूटण्यासाठी संशयित आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला असल्याचा धक्कादायक खुलासा संशयिताला अटक केल्यानंतर झाला आहे. अंगावरील दागिने लूटण्याच्या उद्देशाने महिलेचा खून केल्यानंतर फक्त पायातील चांदीचा वाळा काढण्यासाठी थेट फावड्याने महिलेचे पाय तोडल्याची माहिती या क्रूरकर्मा संशयिताने दिली आहे. खुनाचा शोध करणाऱ्या या पथकाला पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.
मातीखाली लपवले प्रेत
मालेगाव शिवारातील दहिदी गावाच्या शिवारातील पाणताची शेवडी परिसरातील सुमनबाई भास्कर बिचकुले (२८) या महिलेचा अज्ञात आरोपीने सोमवार (दि. ३० जानेवारी) गळा आवळून आणि पाय तोडून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला होता. महिलेचा खून करून पूरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत वन जमिनीत दगड आणि मातीखाली लपवून अज्ञात मारेकरी फरार झाला होता. या अज्ञात संशयित आरोपीच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा आणि लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खून झाल्यानंतर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग पुष्कराज सूर्यवंशी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि मयूर भामरे, मालेगाव तालुका पो.स्टे. चे सपोनि हेमंत पाटील यांनी घटनास्थळास भेट देवून घटनास्थळावर फॉरेन्सीक टीम व श्वान पथकास पाचारण करीत पंचानामा करीत संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता.
तलावातून संशयिताला घेतले ताब्यात
खुनातील संशयित हा चोरलेले दागिने विकण्यासाठी डोंगराळे शिवारातील करंजवन येथील एका सोनाराकडे गेला असता सोनाराने संबंधित माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच आरोपीला पकडण्यासाठी धाव घेतली. संशयिताने पोलिसांना बघताच पळ काढण्यास सुरुवात केली. यावेळी संशयिताने डोंगराळे गावाजवळील तलावात उडी मारली, मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागताच स्थानिक गुन्हे शाखेचेे पोलीस अंमलदार शरद मोगल व दत्ता माळी यांनी तलावात उडया टाकून संशयिताला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने आपले नाव किरण ओमकार गोलाईत (३२, रा. शेजवाळ, ता. मालेगाव, जि नाशिक) असे सांगितले.
अशी घडली घटना
त्याने दहिदी येथे गावाच्या वन जमीनीजवळ असलेल्या शेतात निर्जनस्थळी एक महिला एकटीच काम करत असल्याचे पाहून तिला पाणी पिण्यासाठी आणि मोरेवाडी गावाचा रस्ता विचारण्याचे बहाण्याने जवळ बोलावून तिचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने तिच्याशी झटापट करून तिचा साडीने गळा आवळून व फावड्याने वार करून जीवे ठार मारल्याची कबुली दिली.
तसेच, तिच्या गळयातील सोन्याची पोत आणि हातातील चांदीच्या पाटल्या काढून घेतल्यानंतर पायातील चांदीचे वाळे काढण्यासाठी तिचे पाय फावडयाने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय न तुटल्याने महिलेचा मृतदेह दुचाकीवर टाकून सुमारे एक किमी. दूर अंतरावर वन जमिनीतील नाल्यात घेवून गेला. या ठिकाणी मृतदेह टाकून त्याने महिलेच्या अंगावरील कपडे काढून घेतले आणि काही अंतरावरील पाण्याच्या डबक्यात टाकून दिले. त्यानंतर तो सुमारे चार किमी अंतरावरील करंजगव्हाण या गावी जाऊन तेथून एक कोयता खरेदी करीत घटनास्थळी येऊन मृतदेहाचे दोन्ही पाय घोटयापासून कापून तिच्या पायातील चांदीचे वाळे काढून घेतल्या नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचा मृतदेह आणि तोडलेला एक पाय त्याच ठिकाणी दगड आणि मातीखाली गाडून टाकत एक पाय बाजूच्या झुडूपात फेकून दिल्याची कबुली दिली.
क्रूरतेचा कळस
संशयित आरोपी किरण गोलाईत याच्याविरोधात २०१९ मध्ये मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वेमधून एका महिलेची पर्स चोरी केल्याचा गुन्हा दाखल असून, ज्या पद्धतीने महिलेचे दागिने लूटण्यासाठी क्रूरतेचा कळस गाठला यावरून त्याने अजूनही काही गुन्हे केले असावे असा पोलिसांना संशय असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये सपोनि मयूर भामरे, सपोउनि रविंद्र वानखेडे, पोहवा जालिंदर खराटे, नवनाथ सानप, पोना शरद मोगल, नवनाथ वाघमोडे, सुशांत मरकड, सुभाष चोपडा, फिरोज पठाण, पोकॉ दत्ता माळी, योगेश कोळी, पोकॉ बापु खांडेकर यांच्या पथकासह मालेगाव तालुका पो.स्टे.च्या सहका-यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.