
CM Devendra Fadnavis Empowering disabled people providing them jobs Gadchiroli News
Maharashtra News : गडचिरोली : अपंगत्व असलेल्या दुर्बल युवकांच्या जीवनात शाश्वत बदल घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुढाकाराने राज्य शासन आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ‘युथ फॉर जॉब्स’ या दक्षिण आशियातील नावाजलेल्या संस्थेसोबत भागीदारी केली आहे. यूडीआयडी (दिव्यांग ओळखपत्र) नोंदणी, रोजगार आणि उद्योजकता या माध्यमातून सकारात्मक परिणाम साधण्याच्या प्रयत्नात मागील सहा महिन्यात यूडीआयडी नोंदणीचे दिलेले उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यासोबतच २८ युवकांना रोजगार तर तिघांना उद्योजक बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न यशस्वी झाले आहे.
‘युथ फॉर जॉब्स ग्रासरूट अँकाडमी’ च्या माध्यमातून राबवलेल्या या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यात महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आला. या कालावधीत २९० युवकांना प्रेरीत करून सहभागी करण्यात आले आणि त्यापैकी ६८ युवकांनी कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रयत्नांमुळे २८ युवकांना नोकरी मिळाली. याव्यतिरिक्त, सूक्ष्म उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या ३ युवकांनी ‘रंग-दे’ मार्फत १ लाख २०,००० कर्जाचा लाभ घेत स्वतःचे व्यवसाय यशस्वीरित्या सुरू केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हे तिघे दिव्यांग तरुण झाले आत्मनिर्भर
कौशल्य प्रशिक्षणातून संधी मिळालेल्या तरुणांच्या यशोगाथा प्रेरणादायी आहेत. पंकज डोनाडकर (वय वर्षे २०) जे ४० टक्के अस्थिव्यंग आहेत, बारावी उत्तीर्ण असूनही, त्यांना पूर्वी नोकरीसाठी संघर्ष करावा लागत होता. या प्रशिक्षणातून आत्मविश्वास मिळवल्यानंतर त्यांना गडचिरोलीतील ‘लकी ऑटोमोबाईल्स’ मध्ये संगणक परिचालक म्हणून १ लाख ८ हजार वार्षिक मानधनाची नोकरी मिळाली. ते आता कुटुंबाला आर्थिक मदत करीत आहेत.
५० टक्के कुष्ठरोगजन्य अपंगत्व असलेल्या प्रभाकर चांदीकर (वय वर्षे ५९) यांनी सूक्ष्म उद्यम प्रशिक्षण आणि ४०,००० कर्ज सहाय्याच्या बळावर आपल्या ‘भाम भोले वस्त्रालय’ या कपड्यांच्या व्यवसायाला मोठी चालना दिली आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख २० हजारापर्यंत वाढवले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हा व्यापक परिणाम साधण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले. ‘युथ फॉर जॉब्स’ संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे रोजगार मेळावे आणि यूडीआयडी नोंदणी मोहिमांना गती मिळाली, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोच वाढली. कार्यक्रमात एकूण ३३ गावे
आणि ३ तालुके समाविष्ट करण्यात आले. जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले आणि ८ शासकीय विभाग तसेच हेलन केलर बहुउद्देशीय संस्था व सीआरवाय इंटरनॅशनलसारख्या ३ स्वयंसेवी संस्थांशी जोडणी करण्यात आली. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, २० जूनला गडचिरोलीत अयोजित ‘दिव्यांग समारोह’ ४२ दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक उपस्थित होते.