
हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे २० डिसेंबरला शहराचे किमान तापमान ६.९ तर निफाड तालुक्याचे तापमान थेट ४.५ अंश सेल्सिअवर घसरून नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांना हाडे गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला होता. सोमवारी शहरात किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८.१ इतके नोंदविले गेले. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत कमाल तापमानात थोडी वाढ होईल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, महणजे थंडी हळूहळू कमी होऊन हवामान सौम्य होईल, पण थंडी पूर्णपणे संपणार नाही असेही हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले. सध्या तापमान कमी असल्याने द्राक्ष पिकाची काळजी घ्यावी लागत आहे, मात्र गहू आणि हरभरा पिकासाठी ही थंडी पोषक ठरत आहे.
पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून किमान तापमान स्थिरावण्याची शक्यता आहे. किमान तापमानात लगेचच फारसा मोठा बदल होणार नाही, परंतु त्यात हळूहळू वाढ होऊन खिसमसनंतर थंडी कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच आजपासून सूर्याचे उत्तरायण सुरु झाले आहे. त्यामुळे सूर्य उत्तरेकडे सरकत जाणार आहे. परिणामी हळूहळू कम्तल तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल, परंतु लगेचच थंडी कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया हवामान अभ्यासक दीपक जाधव यांनी दिली.
मागील गेल्या काही दिवसांत पुण्यात किमान तापमान 7.9 ते 10.9 अंशांदरम्यान राहिले असून काही दिवस एकअंकी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम ते अत्यंत खराब स्तरापर्यंत पोहोचला. काही ठिकाणी निर्देशांक 300 च्या पुढे गेल्याने प्रदूषणाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले.