संग्रहित फोेटो
चतु:श्रृंगीमधील जनवाडीत लहानपणीचा मित्र बोलत नसल्यावरुन त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (१९ डिसेंबर) मध्यरात्री घडली आहे. चाकू हल्यात शिवा शिवशंकर सोनकांबळे (वय २५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी श्याम विटकर (वय २५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विटकर आणि सोनकांबळे हे लहानपणापासून मित्र आहेत. दोघांत वाद झाल्याने बोलत नव्हते. सोनकांबळे बोलत नसल्याने विटकर व साथीदाराने शुक्रवारी मध्यरात्री जनवाडी भागात त्याच्यावर चाकूने वार केले. सहायक निरीक्षक धामणे तपास करत आहेत.
धानोरीतही एकाच्या खुनाचा प्रयत्न
धानोरीतही किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. सचिन युवराज पवार (वय २०, रा. एकतानगर, विश्रांतवाडी) याने याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आयुष दीपक गायकवाड (वय १९), स्वप्नील उर्फ अभिनव सुनील गवळी (वय १९, दोघे रा. भीमनगर, विश्रांतवाडी) यांच्यासह सहा अल्पवयीनांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत शाम राजकुमार जाधव (वय २५, रा. कृण्णा आंगण सोसायटी, धानोरी), ओंकार उल्हास कांबळे (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, धानोरीतील आनंद पार्क भागात शुक्रवारी पहाटे आरोपी शेकोटी करुन गप्पा मारत थांबले होते. तेव्हा पाणी आणण्यावरुन आरोपी आणि तक्रारदार पवार, जाधव, कांबळे यांच्यात वाद झाला. यावरुन आरोपींनी पवार, जाधव, कांबळे यांना शिवीगाळ केली. जाधव, कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.






