Colorful flowers on the Kaas pathar famous for wildflowers large crowd of tourists Satara News
Satara Kas Pathar : सातारा/ मेढा : दत्तात्रय पवार : साताऱ्यामधील कास पठार हे रानफुलांसाठी जगप्रसिद्ध आहे. रंगीबेरंगी फुलांच्या अलौकिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जागतिक वारसास्थळ कास पठाराचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. लाखो पर्यटक ही निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यासाठी येत असतात. यंदा हंगाम सुरु झाल्यानंतर लागून सुट्ट्या आल्याने पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली होती.
या आठवड्यामध्ये शुक्रवारी ईद-ए मिलाद, शनिवारी अनंत चतुर्दशी व रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे कास पठारला पर्यटकांनी गर्दी केली. या आठवड्यात हजारो पर्यटकांनी भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत, पुष्प सौंदर्याचा देखील आनंद घेतला. कासचा अधिकृत हंगाम वनविभाग व कास कार्यकारी समितीच्या वतीने चार सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला. पर्यटकांना सुट्टीच्या दिवशी www.kas.ind.in या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करून येण्याचे आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे आलेल्या पर्यटकांपैकी अधिकहून जास्त पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. तरीही बुकिंग न करता आलेल्या पर्यटकांची संख्याही मोठी होती. कास कार्यकारी समितीच्या वतीने पर्यटकांच्या सोयीसाठी १३२ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून इतर सुविधा ही पुरवण्यात येत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सद्यस्थितीत कास पठारावर अनेकविध दुर्मिळ रंगीबेरंगी फुलांचे दर्शन होऊ लागले असून रिमझिम पाऊस, दाट धुके, आल्हाददायक वारा यामुळे सुंदर असे वातावरण पठारावर पहायला मिळत आहे. हे पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
चौकट पठारावर बहरलीत ‘ही’ फुले
सध्या पठारावर टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, आभाळी, भुईकारवी, सोनकी, तेरडा या फुलांना तुरळक स्वरुपात बहर आला असून पठारावरील फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. पठारावरील लाल गुलाबी तेरडा, गेंद, सीतेची आसवे, चवर, कुमुदिनी फुलांना बहर आला असून उर्वरित इतर फुलेही बहरण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतानाचे चित्र आहे.
पावसाची उसंत मिळाल्यामुळे कास पठार फुलांनी फुलले
दरम्यान पावसाने बुधवारपासून उघडीप दिल्याने पठारावरील फुले उमलू लागलेली आहेत. पठारापर्यंत ऊन पाहायला मिळत असून पठारावर गेल्यानंतर धुके व अधून मधून ऊन सावल्यांचा निसर्गाचा खेळ सुरू असल्याने येथील वातावरण अतिशय सुंदर,अल्हाददायक असे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा या विविध छटांचा आनंद लुटता येत आहे. त्याचबरोबर ऊन सावल्यांच्या खेळामुळे पठारावरील फुले देखील उमलू लागलेले आहेत.
चौकट उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पदभार घेतल्यानंतर यावर्षी कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू होताच नवनवीन उपक्रम त्यांच्याकडून सुरू करण्यात आले आहेत. पठारावर कास कार्यकारी समितीच्या वतीने शहरी भागातून येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीणपनाचे आकर्षण असल्याने पठारावर बैलगाडीच्या सफरीतून आता पर्यटकांना फुले पाहता येणार आहेत. अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बैलगाडी सफरला पर्यटक अधिक पसंती देत असून कुमुदिनी तलावापर्यंत ही बैलगाडी पर्यटकांना सेवा पुरवत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कास पठारला भेट दिल्यानंतर पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सांगलीहून खास कास पठार पाहण्यासाठी वैभव बंडगर नामक पर्यटक आले होते. ते म्हणाले की, “आम्ही नुकतीच पठाराला भेट दिली. फुलांचे प्रमाण समाधानकारक असून. पठारावर धुके व अधून मधून ऊन असे अल्हाददायक वातावरण असल्याने कास खरोखरच “खास” आहे, अशा भावना पर्यटकांनी व्यक्त केल्या आहेत.