सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपले; रस्ते खचले अन् घरात पाणीही शिरले
सोलापूर : सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपले आहे. बुधवारी पहाटे दमदार पाऊस झाला. मध्यरात्री 2 ते पहाटे 5.30 पर्यंत पाऊस सुरू होता. या अडीच तासांच्या काळात तब्बल 37.4 मिलिमीटर पाऊस बरसल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली. दाटीवाटी असलेल्या लोकवस्तीत पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
सोलापूर शहरातील महत्त्वाचे रस्ते पावसामुळे खचले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतेवेळी त्यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात फिरावे लागले. रात्री बाराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान, गुरुवारपासून चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे आजही दमदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
मध्यरात्रीनंतर वातावरणात बदल होऊन पहाटेच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. हा पाऊस शहरात सर्वत्र होता. शिवाय शहर परिसरातही बरसला. पाऊस आल्याने बुधवारी कमाल तापमानात 2.3 अंशाने घटून 32.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. सध्या परतीच्या पावसासाठी पोषक स्थिती आहे. हा पाऊस 15 ऑक्टोबरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. परंतु सातत्य नसणार आहे. अधून-मधून दमदार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान शास्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला.
गेल्या चार दिवसात तापमानात सतत वाढ
गेल्या चार दिवसात तापमानात सतत वाढ होत राहिली. तापमान वाढीमुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. 9 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 34.9 अंश सेल्सिअसवर पोहचले होते. परिणामी, उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला होता. तापमान वाढीमुळे हवेचे दाब 1003 हेप्टापास्कलपर्यंत खाली आले. सध्या परतीच्या पावसासाठी पोषक स्थिती आहे.
दररोज किमान 15 मिमी बरसण्याचा अंदाज
सोलापूर शहर जिल्ह्यात आजपासून 14 सप्टेंबरपर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. चार दिवसात दररोज किमान 10 ते 15 मिलिमीटर पाऊस बरसेल. शिवाय प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अक्कलकोट येथील बोरी पूर नियंत्रणासाठी प्रकल्पातून एकूण 1500 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग गुरुवार सकाळी 6:00 वाजता वाढवून 4000 क्युसेक इतका करण्यात आला आहे.