Congress state president Harshvardhan Sapkal's reaction on Maratha reservation GR
मुंबई : पुण्याच्या कोथरुड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं तीन तरुणींना पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक आणि छळ केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी चौकशी करण्याच्या नावाखाली तीन तरुणींना ताब्यात घेतलं. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, जातीवाचक शिवीगाळ देखील केली. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर पुण्यातील वातावरण तापलं आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरुन प्रतिक्रीया दिली आहे.
राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलमाखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठिशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय. कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत. तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे, कोयता गँगचा हैदोस सुरु आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत पण कारवाई मात्र करत नाहीत, असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा. पुणे पोलीसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
रोहित पवारही आक्रमक
पुण्याच्या कोथरूडमध्ये तीन तरुणींना पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनीच त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप होत आहे. अशामध्ये या प्रकरणामध्ये आता विरोधकही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी रविवारी (3 ऑगस्ट) रात्री पीडित तरुणींची भेट घेतली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर रोहित पवार हे तरुणींसह पोलीस आयुक्तालयात गेले आणि कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते पहाटेपर्यंत आयुक्तालयात ठाण मांडून होते.