हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर निवड होताच कार्यकारिणीत खांदेपालटाचे वारे
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया क कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यासह सर्व प्रदेश कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. पदग्रहण सोहळ्याची तयारी झाली असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आले आहे.
नाना पटोले यांनी चार वर्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कठीण काळात स्वीकारलं प्रदेशाध्यक्षपद
“महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे महायुतीचे सरकार असेल यात काही शंका नाही. हा काळ विरोधी पक्षांसाठी आव्हानात्मक असणार आहे, त्यामुळे अनेक प्रभावशाली नेत्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी स्वीकारली नाही. मात्र, सपकाळ यांनी कठीण काळात पक्षाला साथ देऊन प्रदेशाध्यपद स्वीकारले आहे,” असे काँग्रेसमधील एका अंतर्गत सूत्राने सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं होतं. शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीत आक्रमक प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत १३ जागा जिंकून काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यातच एका अपक्ष खासदाराचा पक्षाला पाठिंबा मिळाल्याने राज्यातील काँग्रेस खासदारांची एकूण संख्या १४ झाली आहे.