जनसुरक्षा कायद्यावरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर साधला निशाणा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. महाराष्ट्राच्या या चिप मिनिस्टरला आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागले आहेत आणि त्यासाठीच गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉटला अभिप्रेत भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून ही सर्व खटाटोप केलेली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार परिषद आयोजित केली होती. या परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आमदार विनोद निकोले, अजित नवले, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, उल्का महाजन, भालचंद्र कांगो, उदय भट आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मोदीनंतर पंतप्रधानपदासाठी एक बाबा पुढे आहे आणि तो पुढे गेला तर आपले अवघड आहे, हे पाहून मायबोलीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही फडणवीस यांनी केले आहे. सत्तापिपासू वृत्ती व बंच ऑफ थॉय साठी हा कायदा आणला आहे. पण सर्व संविधानवादी लोकांनी याचा विचार केला पाहिजे. डावे उजवे असा वाद लोकशाहीसाठी चांगला असला तरी एकत्र येऊन लढले पाहिजे. इंग्रजांनी जेल, मेल व रेल सुत्र वापरून राज्य चालवले होते आणि आत्ताचे सत्ताधारी सुद्धा तेच सुत्र वापरत आहेत. दळवळणासाठी पत्र वापरले इंटरनेटच्या जमान्यात मेल झाले त्याचा कंट्रोल त्यांच्या हाती आहे. युनिव्हर्सीटींची अवस्था अत्यंत वाईट आहे पण हॉट्स ऍप युनिव्हर्सिटी जोरात आहे. आणि जेल म्हणजे जो सरकार विरोधात बोलेल त्याला जेलमध्ये टाकले जाईल, अशी टीका सपकाळ यांनी केली.
सरकारकडे पगार करण्यास पैसे नाहीत पण शक्तीपीठ महामार्गासाठी ८८ हजार कोटी रुपये आहेत. हा महामार्ग एका उद्योगपतीसाठी बनवला जात आहे. आणि मुंबईतील जमीन दुसऱ्या उद्योगपतीला दिली आहे. सरकार जवळ बुलडोझर आहे आणि सरकार तो लोकशाहीवरही चालवू शकते. या सरकारकडे कान डोळे तर नाहीतच पण अक्कलही नाही अशा सरकारविरोधात लढण्यासाठी लढण्याची पद्धतही बदलावी लागेल. काँग्रेस पक्षाने जनसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध केलेला आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या कायद्याची होळी केली, मशाल यात्रा काढली आहे. यापुढेही या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोधच राहिल असेही सपकाळ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो असलो तरी पण आज राष्ट्रीय गरज म्हणून एक आहोत. लोकशाहीच्या मुल्यावर संकट आले आहे, संस्थांवर हल्ला सुरू आहे. न्यायसंस्थेतही घुसखोरी झाली आहे. एका पक्षाचे काम केलेल्या व्यक्तीला न्यायाधीशपदी नियुक्त केले आहे. जनसुरक्षा कायद्याने विचार व मूलभूत अधिकारावर हल्ला केला आहे. आता या सरकारला जागा दाखवण्याची गरज आहे त्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे शरद पवार म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, डावे उजवे असा कोणताही भेदभाव न करता लोकशाहीवरचे हे संकट हाणून पाडण्यासाठी सर्व जण एकत्र आले आहेत. या सरकारने आणलेला हा कायदा रद्द करण्यासाठी तीव्र लढा देऊ, असे ठाकरे म्हणाले.