
अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला...; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
मुंबई : नाशिकपासून मुंबईत लाँगमार्च करत आलेल्या व दादरच्या काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अटक करणे भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा प्रकार आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरजच काय, पोलिसांनी विद्यार्थ्यांसह NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके व मुंबई NSUI चे अध्यक्ष प्रद्युम यादव यांची तत्काळ सुटका करावी, अन्यथा काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालतील, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, काँग्रेस कार्यालयात पोलिसांना घुसवून आदिवासी विद्यार्थी व NSUI चे प्रदेशाध्य सागर साळुंके व मुंबई NSUI चे अध्यक्ष प्रद्युम यादव यांना ताब्यात घेण्याची कारवाई ही दंडेलशाही आहे, आंदोलनासाठी आलेले हे विद्यार्थी काही गुन्हेगार आहेत का. आंदोलन करणे गुन्हा आहे का, देवेंद्र फडणवीस, अति तेथे माती हे लक्षात ठेवा. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मध्यरात्री पोलीस पाठवता, तुम्ही आमच्या कार्यालयात घुसलात आता आम्ही वर्षा बंगल्यावर चाल करु. आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आम्ही कदापी सहन करणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे, असेही सपकाळ म्हणाले.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस कार्यालयात पोलीस पाठवून आदिवासी विद्यार्थ्यांवर कारावई करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शोभत नाही. विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी व न्याय मागण्यासाठी आले असताना त्यांच्यावर पोलीस कारवाई करणे योग्य नाही. टिळक भवन हे काँग्रेसचे कार्यालय असून येथे कोणीही येऊ शकतो पण पोलिसांनी या कार्यालयाभोवती बॅरिकेड्स लावून नाकाबंदी केली आहे. हे जंगलराज आहे का, असा सवालही वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.
आमदार भाई जगताप यांनीही टिळक भवनला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी काँग्रेस कार्यालयात घुसून केलेली कारवाई निषेधार्ह आहे. मध्यरात्री ताब्यात घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थी काही गुन्हेगार नाहीत. पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन येलो गेट पोलिस स्टेशन तर काहींना ठाण्याकडे घेऊन गेले, यात काही मुली आहेत. तीन तास यांना पोलिस स्टेशनबाहेर उभे केले. एनएसयुआयच्या अध्यक्षांना ताब्यात घेऊन शहरभर फिरविले, हे काय चालले आहे. पोलिसांची ही दंडेलशाही, गुंडगिरी काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशाराही भाई जगताप यांनी दिला.
काँग्रेस पक्षाचे कार्यालय टिळक भवनमध्ये पोलिसांनी मध्यरात्री घुसून केलेल्या कारवाईचा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी निषेध केला असून, सरकारच्या या दडपशाहीला काँग्रेस भीक घालत नाही. काँग्रेस पक्ष आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे सांगितले आहे.