
UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा
UP Assembly Election : पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील काँग्रेस व समाजवादी पक्षाने (सपा) मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी 23 नोव्हेंबरपासून काँग्रेस व समाजवादी पक्ष जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात करणार आहे.
दोन्ही पक्षांमधील पहिली संयुक्त बैठक सोमवार, 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या बैठकीत आघाडीतील घटक पक्षांकडून मागणी करण्यात येणाऱ्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांच्या निवासस्थानी ही पहिली बैठक होणार आहे. दरम्यान, सपाने जागावाटपाच्या चर्चेसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि खासदार राम गोपाल यादव, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष श्यामलाल पाल तसेच खासदार राजीव राय आणि इकरा हसन यांचा समावेश आहे.
दरम्यान, काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी रविवारी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय असण्याची गरज व्यक्त केली. आगामी निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनीही जागावाटपावरून काँग्रेस आणि सपामध्ये मतभेद होण्याची शक्यता फेटाळून लावली. भाजप सरकारला सत्तेतून दूर करणे हे दोन्ही पक्षांचे समान उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जागावाटपाबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी आघाडीच्या चर्चेचा मुख्य उद्देश समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना राजकीय प्रतिनिधित्व देणे हा असल्याचे सांगितले. मागासवर्गीय, दलित, आदिवासी, महिला, युवक, शेतकरी आणि अल्पसंख्याकांसह विविध समाजघटकांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, यावर काँग्रेसचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जागावाटपासाठी ‘जिंकण्याची क्षमता’ हा महत्त्वाचा निकष असावा, असे मत व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील काही जागांवर काँग्रेसही विजय मिळवू शकते, असे सांगत त्यांनी त्या जागांबाबत आघाडीसमोर प्रस्ताव मांडण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Ans: काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांच्या निवासस्थानी पहिली बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Ans: राम गोपाल यादव, श्यामलाल पाल, राजीव राय आणि इकरा हसन यांचा समितीत समावेश आहे.
Ans: जागावाटप करताना संबंधित उमेदवाराची किंवा पक्षाची ‘जिंकण्याची क्षमता’ महत्त्वाची असावी, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.