
इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत 'हा' बडा नेता काँग्रेसमध्ये
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष लहू निवंगुणे, निवास शेळके यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत मयूरसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहू निवंगुणे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देत मयूरसिंह पाटील यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला. मयूरसिंह पाटील हे काँग्रेसचे दिग्गज ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत शंकररावजी पाटील यांचे पुतणे, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला केवळ पक्षबदलापुरते मर्यादित महत्त्व नसून, इंदापूरच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मयूरसिंह पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रवीण माने यांच्यासोबत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीला नवे वळण मिळाले आहे.
निवास शेळके यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
इंदापूर तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी निवास शेळके यांनी तालुकाध्यक्ष म्हणून सातत्याने प्रयत्न केले. गावोगावी कार्यकर्त्यांशी संपर्क, पक्षविस्तार आणि संघटनात्मक कामाला त्यांनी गती दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुणे जिल्हा (दक्षिण)काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे तालुक्यातील संघटनात्मक नेतृत्वाची धुरा आता मयूरसिंह पाटील यांच्याकडे आली असून, निवास शेळके यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार?
मयूरसिंह पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविणे आणि निवास शेळके यांना जिल्हा उपाध्यक्षपदी संधी देणे, या निर्णयातून काँग्रेसने इंदापूरमधील संघटनात्मक नेतृत्वात बदल केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सहकार क्षेत्र आणि तालुक्यातील बदलती राजकीय समीकरणे पाहता या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मयूरसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व मिळाले असून, निवास शेळके यांच्या जिल्हा पातळीवरील नियुक्तीमुळे त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेण्यात आली आहे. आता मयूरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीने पुढे जाणार आणि आगामी राजकीय घडामोडींमध्ये पक्षाची भूमिका काय राहणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Ans: भाजपचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
Ans: काँग्रेसने मयूरसिंह पाटील यांची इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
Ans: विद्यमान तालुकाध्यक्ष निवास शेळके यांची त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत पुणे जिल्हा (दक्षिण) काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.