Congress Criticized Medha Kulkarni: पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी याचा निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, पतीत पावन संघटना आणि मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आले. मात्र, पोलिसांनी या सर्व हालचालींवर मज्जाव केला. यावेळी पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. पण या प्रकरणावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेधा कुलकर्णी यांची खिल्ली उडवली आहे.
सचिन सावंत यांनी सोमवारी ट्विट करत, पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आणि काही हिंदुत्तवादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जाऊन गोमूत्र शिंपडले. हे पाहून कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. यांना शनिवारवाडा हे तिर्थस्थान किंवा देवस्थान वाटत आहे का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, शनिवारवाड्यात ‘मस्तानी’चा बराच काळ वावर राहिला आहे. पण पेशव्यांच्या सरदारांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज काढून युनियन जॅक फडकावला होता. जर त्या महिला अशा ठिकाणी देवाचे नाव घेत असतील तर यांच्या पोटात दुखायला लागतं. तर तुम्हीही तिथे बसून जप करत बसा, तुम्हाला कोणी अडवले आहे आहे का?” शनिवारवाड्याच्या बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे. त्यामुळे पेशव्यांना त्याबद्दल पेशव्यांना काही अडचण नव्हती. त्या दर्ग्याला शिवून तिथून हवाही येते, ती हवा तुमच्या नाकात गेली असेल, त्यामुळे नाक अशुद्ध झालं असेल तर तुमच्या नाकातही गोमुत्र घालून घ्या.
आजही पुणेकर म्हणतात, त्या शनिवार वाड्यातून काका मला वाचवा अशा आर्त हाका ऐकू येतात, हा निश्चितपणे अंद्धश्रद्धेचा भाग असेल पण जर असा काही समज असेल तर तिथे जाऊन तुम्ही रामरामचा जप करत बसा, जेणेकरून तिथल्या लोकांच्या अंद्धश्रद्धा दूर होतील. त्या शनिवार वाड्यात इतक काही घडून गेलं असेल तर तुमच्या समजेनुसार जर गोमुत्र शिंपडून सर्व काही शुद्ध होत असेल तर संपूर्ण शनिवार वाडाच धुवून काढावा लागेल. तुम्ही हे करा, त्यांनी काही होवो अथवा न होवो, पण तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हेही जनतेला कळून चुकेल, अशी टिकाही सचिन सावंत यांनी केली आहे.
दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीदेखील यावरून टीका केली होती. रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी सातत्यांने पुण्यातील शांतता आणि ऐक्य धोक्यात येईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्या खासदार आहेत हे त्या विसरल्या आहेत. पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करत आहेत. कोथरूडमध्ये नाटकं केली, आता कसब्यातून पुन्हा वातावरण पेटवण्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.