रत्नागिरी: कॉँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांनी आज रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधु एकत्र येणार, दोन्ही पवार एकत्र येणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शस्त्रबंदी यावर भाष्य केले आहे. राज्यात सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही असे भाई जगताप म्हणाले आहेत.
रत्नागिरीमध्ये बोलताना आमदार भाई जगताप म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने स्वतःहून लावलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने यांना झापल्यानंतर निवडणुका घ्यावा लागत आहेत. येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. या निवडणूका कार्यकर्त्यांच्या असतात, त्यामुळे ह्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे.”
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार की नाही हे केवळ राज ठाकरेच सांगू शकतात. ते काय करणार आहेत ते राज ठाकरेच सांगू शकतात. दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येणार की नाही ते येत्या काळातच कळेल. दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे. मात्र राजकीय घडामोडीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही’, असे भाई जगताप म्हणाले.
शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sharad Pawar-Ajit Pawar News: शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान
माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेससोबत युती करणं हेच चुकीचंच होतं. हे आम्ही त्यांना आधीपासूनच सांगत होते. पण आता त्यांना त्याचा प्रत्यय येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवाले तुमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाहीत. हेच आम्ही त्यांना अनेकदा सांगत होतो. पण आता जसजसे त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे. तसतसे ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीतील ही फूट कौटुंबिक मानली जात असली तरी ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
काँग्रेस तरी कुठे उबाठासोबत आहे. गेल्या चार महिन्यात त्यांची काँग्रेससोबत कोणती बैठक झाली, कधी यांनी त्यांना फोन केला, किंवा त्यांना यांना फोन केला असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला. पुढील काळात उबाठा गटाल एकट्यानेच वाटचाल करावील लागणार असल्याचं दिसत आहे. हा एकट्याचा प्रवास त्यांना खूप महागात पडणार आहे. ते हिंदुत्त्वाशी एकरूप राहिले नाही, मग महाविकास आघाडीत जाऊनही ते महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाहीत. त्यांची अवस्था आता ना घर का ना घाट का अशी झाली आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.