मीरा-भाईंदरमध्ये चिखल फेक आंदोलन
मीरारोड : राज्यामध्ये अनेक ठिकाणी महापुरुषांचा अपमान, जाती धर्मामध्ये तेढ, पेपरफुटी असे अनेक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार, खून, हल्ले यांच्यामध्ये लगेच कोणत्या प्रकारची कारवाई केली जात नाही. गुन्हे करणारे त्याचबरोबर दारू पिऊन रस्त्यावर वाहन चालवणारे सर्रास नागरिकांना चिरडतात. श्रीमंत पोरांना वाचवणारी आणि त्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकणारी भ्रष्ट शासकीय यंत्रणा ज्वलंत प्रश्न न हाताळता गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. आपली सत्ता वाचवण्यासाठी गलिच्छ राजकारणामध्ये मग्न झाली आहे.
महायुती सरकारच्या विरोधात शुक्रवारी २१ तारखेला मीरा भाईंदर शहरात मीरा-भाईंदर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष कार्यालयाच्या समोर महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देत जिल्हा कार्यालय, मीरा रोड येथे “चिखल फेक ” आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. देशामधील शेतकरी, सामान्य नागरिकांवर त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा छळ होत आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिवसभर शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला पीक विमापासून वंचित ठेवले जात आहे.
राज्यामध्ये अनेक पेपर फुटीच्या घटना समोर आल्या आहेत. यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ होणे, पेपर फुटणे हे विद्यार्थी आणि पालकवर्गाला त्रासदायक आहे. यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जनसामान्यसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसारमाजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा, ब्लॉक काँग्रेस, युवक महिला काँग्रेस, पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, सेलचे पदाधिकाऱ्यांनी युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला जात आहे.






