काँग्रेसचा उद्या बुधवारी ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा; 'हे' बडे नेते राहणार उपस्थित
मुंबई : भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदानात मोठा घोळ करून सत्ता मिळवली आहे. या मतचोरीची पोलखोल काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केली आहे. भाजपाच्या या मतचोरीविरोधात काँग्रेस पक्षाने ‘वोट चोर, गद्दी छोड’, आंदोलन सुरु केले असून, नागपूर जिल्ह्यातील कामठी मध्ये उद्या बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कामठी येथील मेळाव्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री सुनिल केदार, खा. श्यामकुमार बर्वे यांच्यासह काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतचोरी झाल्याचा संशय बळावला होता. महाराष्ट्रातील मतचोरीसह देशभरातील विविध मतदारसंघात मतचोरी केल्याचा पर्दाफाश राहुल गांधी यांनी केला. यात कामठी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगस मतदार नोंदणीही उघड करण्यात आली. या मतचोरीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय मेळावे आयोजित करण्य़ाचा निर्णय घेतला असून, उद्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघात हा राज्यस्तरिय मेळावा होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.