
कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाच्या मान्यतेने, खासदार शाहू महाराज छत्रपती, विधानपरिषद गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेसच्या १४ उमेदवारांची दुसरी यादी मंजूर करण्यात आली आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारामुळे महाविकास आघाडीतील उमेदवार निश्चित करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी मतभेदांमुळे राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्ष यांची स्वतंत्र युती आकारास आली आहे. सर्व आघाडी व युतींच्या उमेदवारांच्या घोषणा झाल्यानंतर अनेक इच्छुक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी नगरसेवक नेजदार यांना डावलले
दुसऱ्या यादीत प्रामुख्याने माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना संधी दिली आहे. मात्र माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांना यावेळी डावलण्यात आले आहे. माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, पद्मावती काकासाहेब पाटील, माजी नगरसेवक अजित पोवार यांच्या पत्नी रुपाली पोवार, माजी नगरसेवक हरिश चौगले यांचे पुत्र सचिन चौगले, शिवाजी कवाळे यांचे पुत्र रोहित कवाळे, अॅड. नीलेश नरुटे यांच्या पत्नी पुष्पा नरुटे, सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे विनायक कारंडे आणि सरोज सरनाईक यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे.
उद्धवसेना काँग्रेससोबत लढणार
महायुतीची यादी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने दोन टप्प्यांत उमेदवार घोषित करत आघाडी घेतली आहे. आतापर्यंत एकूण ६१ उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय मनसेच्या एका उमेदवारालाही काँग्रेसकडून पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ‘मातोश्री’वरून आलेल्या सूचनांनुसार उद्धवसेनेने काँग्रेससोबत सात जागा लढवण्याचा निर्णय मान्य केला आहे. शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पक्षादेश मान्य करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उद्धवसेनेतील प्रमुख पदाधिकारी शशिकांत बिडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपली भूमिका सोमवारी स्पष्ट करणार असल्याचेही संकेत आहेत.