गोदिंया : राज्यामध्ये आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर टीका केल्या आहेत. दरम्यान, कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल पटेल यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीकास्त्र डागलं आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “त्यांच्याकडे काय कुंडल्या आहेत ते माहीत नाही. परंतु प्रफुल पटेल यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यांनी सुरुवात करावी, आमच्याकडे पण त्यांच्या कुंडल्या आहेत. असा इशारा नाना पटोले यांनी दिला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपा नंबर एक ची पार्टी असते, तर प्रफुल पटेल हे राज्यसभेवर कशाला निवडून गेले असते?” असा सवाल नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत उपस्थित केला.
पुढे नाना पटोले म्हणाले, “त्यांनी मैदानात यायला हवं होतं, खरं पाहिल तर ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. कारण त्यांना माहित आहे की, भंडारा- गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद उरलेली नाही. म्हणून ते राज्यसभेमध्ये निवडून गेलेत. निवडणुकीमध्ये सर्वांनाच माहीत होईल की, भंडारा-गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस हीच खरी ताकद असल्याच दिसून येईल.” असा विश्वास कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.