
सांगोला : ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा. पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी एक हजार घरांचे प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यातून पाठवले असल्याची माहिती, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
सांगोला पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणच्या निमित्ताने व पोलीस पाटलांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या की, सर्वच अवैद्य धंद्यांवरती कारवाया करण्यात आल्या आहेत. परंतु या कारवाया पुरेशा नाहीत. त्या कारवाया वाढल्या पाहिजेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सन २०२० पेक्षा २०२१ मध्ये जुगार, दारू, हातभट्टी यावर अधिक कारवाया झाल्या आहेत. तर सन २०२२ मध्ये त्यापेक्षा अधिक आहेत. अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो.
वाळू चोरांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार
अवैद्य वाळू धंद्यांसह वाळू चोरांची पाठराखण करणार्या पोलिसांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. नगरपरिषदेचा भाग वगळता प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असून या माध्यमातून दरोडे, घरफोड्या, अपहरण, अवैद्य दारू व्यवसाय, वाळू चोरी थांबवले आहेत. या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यापुढेही अधिक प्रभावी वापर करून जिल्ह्यातील अवैध व्यवसय व विशेषतः वाळू चोरी कमी करता येऊ शकेल. असं त्या म्हणाल्या.
[read_also content=”कृषी विद्यापीठ दगडफेकप्रकरणी कारवाई होणार; वारंवार होणाऱ्या घटनांची दखल घेणे गरजेचे https://www.navarashtra.com/maharashtra/action-to-be-taken-in-case-of-stone-pelting-in-agricultural-university-it-is-necessary-to-take-note-of-frequent-incidents-nrdm-310672.html”]
…तर तडीपारीची कारवाई करणार
दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर तडीपारचीही कारवाई करण्यात येत आहे. अवैद्य धंद्याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेची संवाद साधला निश्चितपणे या धंद्यांना आळा बसू शकेल. ऑपरेशन परिवर्तन हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात माझ्या संपूर्ण टीमचे यश आहे. असंही यावेळी सातपुते यांनी म्हटलं आहे.