जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान
Akola News: नागपूर रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील सहा रेल्वे पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीत अकोला जीआरपी पोलिस ठाणे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर जीआरपीमध्ये ६५६, अकोला ३२६, वर्धा २७९, बडनेरा १८५, गोंदिया १७० आणि इतवारी ६५ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. नागपूर रेल्वे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात नागपूर, अकोला, वर्धा, बडनेरा, गोंदिया आणि इतवारी या सहा रेल्वे पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. यापैकी नागपूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे नोंदविण्यात आले.(फोटो सौजन्य – AI)
अकोला जीआरपीचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे अकोल्याची आकडेवारी वर्धा, बडनेरा, गोंदिया आणि इतवारी या चारही पोलिस ठाण्यांपेक्षा अधिक आहे. अकोला जीआरपीकडून वेळोवेळी विविध कारवाया करून आरोपींना अटक केल्याची माहिती प्रसिद्ध केली जाते. मात्र, किरकोळ कारवायांच्या प्रसिद्धीपेक्षा एकूण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाययोजना कितपत प्रभावी ठरत आहेत, हा प्रश्न या आकडेवारीमुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे अकोला जीआरपीच्या कामगिरीचे पुनरावलोकन करणे गरजेचे झाले आहे.
अकोला रेल्वेस्थानक व परिसर हा प्रवाशांच्या मोठ्या वर्दळीचा भाग असल्याने येथे प्रवाशांच्या मोबाइल, सामान व मौल्यवान वस्तूंच्या चोरीसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे हे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता गुन्हे प्रतिबंधासाठी अधिक प्रभावी गस्त, सीसीटीव्ही निरीक्षण, संशयितांवर लक्ष आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
अकोला रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हा घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना, रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था आणि संवेदनशील ठिकाणी सातत्याने गस्त वाढविणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोला जीआरपीच्या कार्यपद्धतीचे आणि गुन्हे नियंत्रणाच्या उपाययोजनांचे नियमित पुनरावलोकन होणे गरजेचे आहे.






