
फोटो सौजन्य - Social Media
धाराशिव जिल्ह्यात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यक्तीची तब्बल ११ लाख ४६ हजार ९५६ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिक परतावा आणि कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल विलास भोसले (वय ४७, रा. काजळा, ता. जि. धाराशिव) यांना ३० डिसेंबर २०२५ ते २० मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी ‘रियल डेस्क’ आणि ‘ग्रो इंडिया’ या ॲपद्वारे ऑनलाइन गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून भोसले यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला कमी रकमेवर परतावा दाखवून त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यात आला. त्यानंतर विविध व्यवहारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले.
आरोपींनी दिलेल्या सूचनांनुसार भोसले यांनी वेळोवेळी रक्कम भरली. मात्र, गुंतवलेली रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींकडून आणखी पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संपूर्ण प्रकारात त्यांची ११ लाख ४६ हजार ९५६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली.
या प्रकरणी आशीष कुमार, निलेश शर्मा, ऋषभ जोशी, गौतम सर, रणविजय सिंग, रोहित शर्मा तसेच संबंधित मोबाईल क्रमांकधारकांविरुद्ध अनिल भोसले यांच्या फिर्यादीवरून १४ जुलै २०२६ रोजी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३२०, ३२१, ३३५, ३३६, ३४० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) आणि ६६(डी) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
अलीकडच्या काळात ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे. सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप किंवा फोन कॉलद्वारे संपर्क साधून जास्त परताव्याचे आमिष दाखवले जाते आणि त्यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संस्थेच्या गुंतवणूक योजनांवर त्वरित विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Hemant Dhome : ‘सोनम वांगचुक यांच्या जीवावर…’ अभिनेत्याने सरकारवर साधला निशाणा! केली पोस्ट
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणतीही ऑनलाइन गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी किंवा ॲपची विश्वासार्हता तपासण्याचा सल्ला दिला आहे. अनोळखी लिंक, ॲप किंवा टेलिग्राम-व्हॉट्सॲप ग्रुपवरील गुंतवणुकीच्या ऑफरपासून दूर राहावे. तसेच फसवणुकीची शंका आल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.