"जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय..."; शेरोशायरी करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर डागले टीकेचे बाण
Eknath Shinde: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून शिवोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. शिवसेनेकडून शिवोत्सव कार्यक्रमाचे आयोजन बीकेसी मैदानावर करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या गोष्टींवर भाष्य केले आहे, ते जाणून घेऊयात.
शिवोत्सव कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आपण लोकसभेपाठोपाठ विधानसभेत देखील ऐतिहासिक विजय मिळवला. बाळासाहेबांच्या विचाराने, प्रेरणेने आपण सर्व शिवसैनिक बनलो आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला, त्यामुळे आपल्याला दणदणीत विजय मिळाला. तो विजय आपण साजरा करतोय. आपल्या विजयाची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. हे यश बाळासाहेबांच्या विचारांचे आहे. हे यश महायुतीचे आणि राज्यातील लाडक्या जनेतेचे आहे.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आपण अनेक विकासाची कामे केली. अनेक कल्याणकारी योजना केल्या. आपल्यावर राज्यातील जनतेने विश्वास दर्शवला. त्यांच्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. मी जनतेसमोर नतमस्तक होतो. आजवरच्या इतिहासात कोणालाही असा विजय मिळाला नव्हता, असा मोठा दणदणीत विजय महायुतीला मिळाला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. दुप्पट वेगाने चौपट काम करावे लागेल. शिवसेनेचा हा भगवा तुमच्या सर्वांच्या साथीने फडकवत ठेवेल हा शब्द मी या ठिकाणी देतो. ”
“जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है और जो तुफानो मै पलते है वही दुनिया बदलते है..”. आपल्याला स्वाभिमान महत्वाचा. अडीच वर्षे मुख्यमंत्री काम केले त्याचे मला समाधान आहे. अडीच वर्षात किती वर्षांचे काम केले याचे मोजमाप जनता करेल. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील आपल्याला मोठा विजय मिळवायचा आहे. तो आपल्याला मिळणार आहे”, असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, स्वबळावर निवडणूक लढवायला मनगटात ताकद लागते. घरात बसून लढता येत नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक”असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तुम्ही विधानसभा निवडणुकीत 97 जागा लढलात आणि 20 जिंकलात. आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जिंकलो. आता सांगा खरी शिवसेना कोणाची? खऱ्या शिवसेनेवर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.”