
Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
निवडणुकीआधी राजकीय हालचालींना आला वेग
केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात सतत काही ना काही सुरू असते. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणूक होण्याआधी महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने या चर्चेला उधाण फुटले आहे.
येणाऱ्या निवडणुकीत महायुती स्वतंत्रपणे लढणार की एकत्रितपणे लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदारांना निधी देणे किंवा अशा अनेक कारणावरून एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे हे अचानक दिली दौऱ्यावर गेल्याचे समजते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
निवडणुकांच्या रणनितीमध्ये महायुती आघाडीवर
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या बाबतीत, भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती महाविकास आघाडीपेक्षा जास्त पुढे असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की जिथे शक्य असेल तिथे युती केली जाईल आणि जिथे युती शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण निवडणूक लढवली जाईल. भाजपचे ध्येय १५० जागा जिंकण्याचे आहे. अजित पवार यांच्या पक्षाचा मुंबईत फारसा प्रभाव नाही, परंतु शिंदे यांची सेना अधिक जागा लढवू शकते.
निवडणुकांच्या रणनितीमध्ये महायुती आघाडीवर; महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?
भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांना भाजपला महापौरपद मिळवून द्यायचे आहेत. भाजप मुंबईत केलेल्या विकासकामांच्या आधारे मते मागेल. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनाही हे लक्षात आले आहे की जर यावेळी मुंबईत त्यांचा पक्ष हरला तर त्यांचा पराभव होईल. मतदार यादीतील मोठ्या प्रमाणात अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या नावाखाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.