काडादी, आडम यांच्यासह शेकडो उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; सोलापूर जिल्ह्यात 10 हजार ‘नोटा’ला मते
सोलापूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला आहे. राज्यातील लाडकी बहिणींनी महायुतीलाच मतदान केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड फिरवण्यात महायुती सरकारच्या पाच योजना कारणीभूत ठरल्या आहेत. अशातचं आता सोलापूर जिल्ह्यातील १५९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात एकूण ९ हजार ८९६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. नोटाचा वापर करणारे सर्वात जास्त ११०६ मतदार सांगोला मतदारसंघात असून, सर्वात कमी ५५७ मतदारांनी शहर मध्य मतदारसंघात वापर केला. जिल्ह्यातील तब्बल १५९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना एकूण वैध मतांच्या एक षष्टांश मते मिळाली नाहीत.
आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्यास नोटा पर्यायाचा वापर करता येता. २०११ पासून ईव्हीएम मशिनवर सर्वात नोटाचे बटन उपलब्ध करून दिल्याने अनेक उमेदवार नोटाचा वापर करत आहेत. यंदाच्या निवडणुकी नोटा पर्याय वापर करण्याचे प्रमाण घटले आहे. २०१९ च्या निवडणुकीत १२ हजार ९४४ मतदारांनी नोट पर्याय वापरला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वात जास्त वापर झालेल्या सांगोला मततदारसंघात २०१९ फक्त ७०० जणांनी नोटा पर्याय वापरला होता. तर माढा मतदारसंघात नोटाला शून्य मते मिळाली होती.
‘नोटा’पेक्षाही मिळाली कमी मते
जिल्ह्यातील अनेक अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. शहर उत्तर मतदारसंघातील माजी महापौर शोभा बनशेट्टी यांना ५५४ मते मिळाली आहेत तर याच मतदारसंघात नोटाला ७१६ मते मिळाली आहेत. शहर मध्य मतदारसंघात ५५७ मते नोटाला मिळाली आहेत तर एम. डी. सैफन शेख (अपक्ष) यांना ५११, खिजर पिरजादे (एआयएफबी) यांना २४४, डॉ. संदीप आडके (अपक्ष) २३०, रविकांत बनसोडे (आरपीआय ए) १४१ यांच्यासह अनेक अपक्षांना नोटापेक्षा कमी मतदान आहे.
१५९ उमेदवारांचे १२ लाख रुपये शासनजमा
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील १८४ उमेदवारांपैकी १५९ जणांचे डिपॉझिट जप्त होणार असून, यातून १२ लाख रुपये शासन जमा होणार आहेत. शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, माकपचे उमेदवार नरसय्या आडम, सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी डिपॉझिट वाचवू शकले नाही. अर्ज दाखल करताना खुल्या वर्गातील उमेदवाराला दहा हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना पाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरावे लागतात. एकूण वैध ठरलेल्या मतांच्या एक षष्टांश मते ज्या उमेदवारांना मिळत नाहीत, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. अशा जिल्ह्यातील सुमारे १५९ उमेदवारांची बारा लाख रुपये अनामत रक्कम जप्त हाेणार आहे.
आडम, नराेटे यांचे डिपॉजिट हाेणार जप्त
मध्य मतदारसंघातून माकपचे उमेदवार नरसय्या आडम महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. त्यांना अखेरपर्यंत महाविकास आघाडीचे तिकिट मिळाले नाही. यामुळे ते माकपच्या विळा हातोडा चिन्हावरून निवडणूक रिंगणात होते. आडम यांना ६७४९ तर काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांना १६०९२ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात डिपॉजिट वाचविण्यासाठी किमान ३३३८१ मते मिळणे आवश्यक आहे. तर शहर दक्षिणमध्ये ३७२७० मते आवश्यक आहेत. मात्र अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना १८७४७ मते मिळाली.
महाविकास आघाडीचे अमर पाटील बचावले
सोलापूर दक्षिण मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची ३९८०५ मते मिळाली आहेत. अवघ्या २५३५ मतांमुळे त्यांचे डिपॉझिट वाचले. या मतदारसंघात डिपॉझिट वाचण्यासाठी ३७२७० मते आवश्यक आहेत. याच मतदारसंघात अखेरच्या क्षणी काँग्रेसने धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला.
मतदारसंघनिहाय नोटाला मिळालेली मते
मतदारसंघ मते
मोहोळ २०४७
पंढरपूर ९२४
करमाळा ९९५
अक्कलकोट ११०४
बार्शी ६९७
शहर उत्तर ७१६
शहर मध्य ५५७
शहर दक्षिण ८२६
सांगोला ११०६
माढा ९२४