
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने साथ द्या, मग आणखी...; अजित पवारांचं मोठं आश्वासन
बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिरात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार जय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व नगरसेवक पदाचे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणावर विकासकामे
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, माझ्या राजकीय जीवनामध्ये बारामतीकरांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कदापिही मी तडा जाऊ दिला नाही. शहरातील निरा डावा कालवा सुशोभीकरण, बाबूजी नाईक वाडा नूतनीकरण, भव्य विविध साठवण तलाव निर्मिती, रस्त्यांचे सुशोभीकरण, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक महाविद्यालय त्याचबरोबर सहाशे कोटी रुपये खर्चाचा शिवसृष्टी प्रकल्प, विविध समाज घटकांसाठी भरून निधी त्याचबरोबर इतर मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.
चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी
बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आपण केले आहे. उर्वरित विकासकामे देखील लवकरच मार्गी लागतील. बारामतीची ओळख अग्रेसर शहर म्हणून निर्माण करण्यासाठी माझ्या विचारांचे सर्व नगरसेवक निवडून येणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना साथ द्या. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. या निवडणुकीत काही समाज घटकांना प्रतिनिधित्व देता आले नाही, मात्र त्या समाजाला इतर विविध कामांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल. तसेच स्वीकृत नगरसेवक पदाच्या चार जागा आहेत, चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला यामध्ये संधी दिली जाईल.
प्रत्येक धर्मपंथाचा आदर करतो
बारामती बस स्थानकाप्रमाणेच रेल्वे स्थानकाचे काम देखील सर्वोत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. वाहतुकीला अडथळा येणारी मंदिरे चांगल्या सुसज्ज जागेत उत्कृष्ट पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या नव्या मंदिरामध्ये पुन्हा प्रतिष्ठापित केली जाणार आहेत. आपण अंधश्रद्धेला मानणारे नसलो तरी श्रद्धेला जपणारे आहोत. प्रत्येक धर्मपंथाचा आदर मी करतो, असंही अजित पवार म्हणाले.
निधीची कमतरता भासू देणार नाही
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांनी बारामती सहकारी बँकेचे काम चांगल्या पद्धतीने केले आहे, त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे, त्यामुळे त्यांना संधी दिली आहे इतर देखील उमेदवार उच्चशिक्षित व चांगल्या पद्धतीने काम करणारे आहेत. इच्छुकांमध्ये अनेक चांगले काम करणारे कार्यकर्ते होते, त्यांना जरी उमेदवारी देता नाही आली, तरी पुढील काळात त्यांना इतर ठिकाणी संधी देण्याचा माझा प्रयत्न राहील. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कधीही निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.