सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच केंद्र सरकारकडेही मोठी मागणी केली आहे.
कोमकर हत्याप्रकरणी अजित पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लहान वयातील मुलं गुन्ह्याकडे वळत असल्याने केंद्र सरकारने १८ आणि २१ वर्षांची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आरोपींवर मोक्का लावण्यात आला असून, कठोर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता पारदर्शक तपास करावा, अशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
हडपसर येथे आयोजित जनसंवाद अभियानात उपमुख्यमंत्री बोलत होते. रस्ता, ड्रेनेज, लाईट यांसारखी आवश्यक कामे पूर्ण केली जातील. सर्वांनी एकोप्याने राहून सण आनंदाने साजरा करावा आणि शहराचे वातावरण चांगले ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम तसेच ३० विभागाचे वेगवेगळे अधिकारी आणि आमदार चेतन तुपे उपस्थित होते.
आम्ही तिघेही समन्वयाने काम करतो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चांना फेटाळत अजित पवार यांनी सांगितले की, आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत. राज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. सर्व अधिकारी उपस्थित असून, त्यांचीही जबाबदारी ठरलेली आहे. नागरिकांची समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य आहे.
कुणावरही अन्याय होऊ देणार नाही
सातारा गॅझेट प्रकरणात कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, सर्वांनी बसून मार्ग काढला जाईल, असे पवार म्हणाले. महिला आयपीएस प्रकरणावर मात्र प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. लोकसंख्या वाढली तसेच प्रभाग रचनेत बदल झालेत. आणि लोकसंख्या वाढीमुळे २०२९ मध्ये खासदारांची संख्या वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
३० शासकीय विभाग एकाच व्यासपीठावर
अजित पवार यांच्या पुढाकारातून हडपसर येथे जनसंवाद उपक्रमाची शनिवारी सुरुवात झाली. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या समस्या थेट अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. जवळपास ३० शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, शिक्षण, आरोग्य, वीजपुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन, मालमत्ता कर, घनकचरा व्यवस्थापन, सहकार, समाजविकास, परिवहन, नोंदणी व मुद्रांक अशा विभागांनी नागरिकांच्या तक्रारी तातडीने नोंदवून त्यावर उपाययोजना केल्या.