'2019 मध्ये जनतेने आपल्याला दिलेला कौल हिसकावून घेतला,' फडणवीसांचा कोणाला टोला? (फोटो सौजन्य-X)
Devendra Fadnavis News In Marathi: अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे. आज (4 डिसेंबर) झालेल्या समितीच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाने फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पंकज मुंडे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. फडणवीस आजच सरकार स्थापनेचा दावा करणार असून उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथविधी घेणार हे निश्चित झाले आहे. यावेळी जनादेशाचा आनंद पण जबाबदारी वाढील, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
“सर्वप्रथम मी सर्व मंत्र्यांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळेची निवडणूक ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. लोकसभेपाठोपाठ हरियाणातून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला जे दिलं आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, यांचंही मी आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवलं. अर्थात एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो.त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान मिळाला.हा पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा झाला. तिथून मला सामान्य कार्यकर्ता हे पद मिळाले आणि काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“हे महत्त्वाचं वर्ष आहे. एकीकडे आपण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, ती प्रक्रिया संविधानाने दिली. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. हे महत्त्वाचं वर्ष आहे. देशाचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगतात कोणत्याही धर्मग्रंथासाठी माझ्यासाठी संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. एक असं संविधान त्याने प्रत्येक भारतीयांना मोठं होण्याचा अधिकार दिला. देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.






