पुणे : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणात काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. धंगेकरांनी यापूर्वी अनेक बार मालकांचे आणि हप्त्यांचे कागद दाखवले होते. त्याचे काय झाले? असा सवाल करत मेधा कुलकर्णी यांनी धंगेकरांना जाब विचारला आहे.
धंगेकर यांच्या आरोपानंतर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, धंगेकर एक प्रकरण धरतात आणि सोडून देतात… दुसरे धरतात सोडून देतात? त्या कागदांचे काय झाले ते आधी सांगा. आम्ही एखादा मुद्दा उपस्थित केला की तो शेवटपर्यंत नेतो, मध्येच सोडून देत नाही. पुण्यातील ड्रग प्रकरणावर पुणे पोलीस तातडीने कारवाया करत आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात योग्य त्या सर्व कारवाया कऱण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणात रविंद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या वर्षभरापासून मी पुण्यातील बार, पब, अंमली पदार्थ, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी करत होतो. पण पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. हुक्का पार्लर ही काय संस्कृती का, तरुणांना बरबाद करण्याचे काम या पब आणि बारमधून सुरू आहे, त्यामुळे सर्व हुक्का पार्लर सील करा. अशी मागणी धंगेकरांनी केली होती. तसेच, रात्री उशीरापर्यंत पार्टी आयोजित करणाऱ्या अक्षय कामठेच्या मागे कोणाचा हात आहे. याचाही शोध झाला पाहिजे, असेही धंगेकरांनी सांगितले होते.
दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बार मालक, मॅनेजर आणि डीजे मालक यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज सकाळी या प्रकरणातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. . सर्वांना आज (२४ जून) दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीतचा व्हिडीओ समोर येताच पुणे पेलिसांच्या गुन्हे शाखेने आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने ५ जणांना ताब्यात घेत कारवाई केली. यात लिक्विड लिजर हॉटेलचा मालक, त्यांचे तीन सहकारी आणि एका कर्मचाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हॉटेललाही टाळे ठोकण्यात आले. तसेच पोलिसांनी हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहेत. पोलीस या तपास करत असून पकडलेल्या सर्व आरोपींची चौकशी सुरू केली आहे.