
'अजितदादांच्या अपघाती निधनाची चौकशी व्हावी', अजित पवारांच्या निधनाने कार्यकर्ते शोकाकुल
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राज्याच्या राजकीय पटलावरून अचानक नाहीसे होणे ही सर्वांसाठीच अतिशय धक्कादायक बातमी आहे, असे स्पष्ट करत या अपघाताची चौकशी व्हावी. लोकांच्या मनातील शंकानिरसन व्हावे. अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापुरकर यांनी केली आहे.
शहापुरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, गेल्या दहा वर्षांत ते विविध कारणांनी महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. त्यांची प्रशासनावरील पकड आणि कामकाजाची उत्तम समज नावाजली गेली. त्यांच्या कामाचा उरक आणि ऊर्जा दांडगी होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची वादग्रस्त विधाने आणि वादग्रस्त राजकीय खेळ्या यांनी त्यांचे कर्तृत्व आणि कारकिर्द झाकोळली गेली. पवार कुटुंबातले ते महत्वाचे आधारस्तंभ होते. त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला, हे दुःखद आहे. राजकीय नेत्यांचा अपघाती मृत्यू हा लोकांच्या मनात कायम संशय निर्माण करतो. अजितदादा पवार यांच्या या अपघाती निधनाची चौकशी होऊन लोकांच्या शंकांचे निराकरण व्हायला हवे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
माझे आत्तेमामा, महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय, कणखर नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दिशा देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन. या धक्कादायक घटनेने सुन्न झालो आहे. या शब्दात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. सहकार, जलसंपदा, वित्त आणि प्रशासन या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी उभे राहिलेले जलसिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घेतलेली ठाम भूमिका, अर्थसंकल्प मांडताना दाखवलेली आर्थिक शिस्त आणि निर्णयक्षमतेचा वेग हे सगळे महाराष्ट्राने जवळून अनुभवले आहे.
“काम बोला” ही त्यांची भूमिका केवळ घोषणा नव्हे, तर कृतीतून दाखवलेली कार्यसंस्कृती आहे. टीका, संघर्ष आणि राजकीय वादळांमध्येही त्यांनी कधी कामाची दिशा बदलू दिली नाही. राज्याच्या विकासासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले, तरी मागे न हटता त्यांनी जबाबदारी स्वीकारली.
सामान्य कार्यकर्त्यापासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडून काम करून घेण्याची त्यांची शैली, वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्पष्ट शब्दांत बोलण्याची सवय हीच त्यांची खरी ओळख. महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्पष्ट, प्रभावी आणि अनुभवसंपन्न नेतृत्व म्हणून अजित पवारांचे योगदान कायम स्मरणात राहील. असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.