
शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत काळे कुटुंबीयांना जमीन देण्यात आली होती. मात्र, या जमिनीवर अन्य व्यक्तींनी कब्जा केल्याचा आरोप संबंधित कुटुंबीयांनी केला आहे. शासनाने दिलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळत नसल्याने आणि आपल्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागत असल्याने काळे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागितल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या तक्रारींची अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
या प्रकरणात न्याय मिळावा आणि हक्काच्या जमिनीवरील कब्जा हटवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करत काळे कुटुंबीयांनी महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला होता. तरीही त्यांच्या प्रश्नावर ठोस तोडगा निघाला नसल्याचा आरोप आहे. अखेर संतप्त आणि हतबल झालेल्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी सेवा सप्ताह आणि सामाजिक न्यायाचे उपक्रम राबविले जात आहेत. एकीकडे आदिवासी व वंचित घटकांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे पारधी समाजातील कुटुंबाला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ येत असेल, तर या उपक्रमांचा नेमका लाभ कोणाला, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
काळे कुटुंबीयांना या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचविण्यास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करावी, जमिनीवरील कथित बेकायदेशीर कब्जा तातडीने हटवावा, संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
शासनाच्या योजनेतून जमीन मिळाल्यानंतरही तिच्या संरक्षणासाठी लाभार्थ्यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत असतील आणि न्यायासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ येत असेल, तर ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून शासकीय यंत्रणेच्या उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. आता तरी जिल्हा प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन काळे कुटुंबीयांना न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.