
शासकीय रुग्णालयात दातांच्या किचकट शस्त्रक्रियांना यश : डॉ. कृष्णा उंदरे देशमुखांच्या सेवेमुळे रुग्णांत समाधान, कृतज्ञता
थेट हाडातून उगवलेले दात बाजूला करणे, अपघातात निकामी झालेला जबडा दुरुस्त करून योग्य प्रकारे बसवणे, अपघातात ओघळलेले ओठ पूर्ववत करणे, तसेच तोंडात दातांच्या बाजूला आलेल्या गाठी जबडा व हिरड्यांना कोणतीही इजा न होता काढून टाकणे अशा अत्यंत अवघड शस्त्रक्रिया डॉ. उंदरे देशमुख यांनी यशस्वीपणे केल्या आहेत. त्यामुळे रुग्ण पूर्वीसारखेच सामान्य जीवन जगू शकत आहेत.
खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत अथवा अत्यल्प खर्चात झाल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. परिणामी धाराशिव जिल्ह्यातील दुर्गम भागांसह जिल्ह्याबाहेरील रुग्णही या दंत चिकित्सा विभागात उपचारासाठी येत आहेत.
“शासकीय रुग्णालयात येणारे बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीतून सर्वोत्तम उपचार देण्याचा माझा प्रयत्न असतो. रुग्ण लवकर बरे व्हावा, हीच माझी प्राथमिकता आहे,” असे मत डॉ. कृष्णा उंदरे देशमुख यांनी व्यक्त केले. याच समर्पण भावनेतून ते प्रत्येक रुग्णाची आस्थेने चौकशी करत उपचार करत असल्याचे चित्र दिसून येते.
अपघातात विलास थोरात यांचा जबडा तुटून विभागला गेला होता. दातांच्या चवळीचेही तुकडे झाले होते. अत्यंत अवघड व खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया डॉ. कृष्णा उंदरे देशमुख यांनी यशस्वीपणे आणि मोफत केली. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने दैनिक नवराष्ट्रच्या प्रतिनिधीसमोर रुग्ण व नातेवाईकांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रुग्णांच्या डोळ्यातील समाधान पाहून डॉक्टरही कृतार्थ झाल्याचे दिसून आले.
“मी गर्भवती असून माझ्या दाढेखाली मोठी गाठ होती. अशा अवस्थेत शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याचा समज होता. मात्र येथील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून मला दिलासा दिला. खासगी रुग्णालयात हजारो रुपयांचा खर्च झाला असता. मात्र येथे उपचार यशस्वी झाल्याने मी पूर्णपणे बरी झाले,” अशी प्रतिक्रिया रुग्ण नाजीया शेख यांनी व्यक्त केलं आहे.