
Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र
Dharashiv Zilla Parishad: धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव तालुक्यातील तेर आणि पळसप गटात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. दोन्ही गटांमध्ये पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने, याआधी अपक्ष असलेल्या उमेदवारांना संबंधित पक्षांच्या अधिकृत उमेदवाऱ्या जाहीर होऊन पक्ष चिन्ह मिळाले. परिणामी या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र पूर्णतः बदलले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तेर गटातून भाजपाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या जया नवनाथ नाईकवाडी यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे छाननीच्या वेळी अपक्ष असलेल्या अर्चना पाटील यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून शेवटच्या क्षणी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने तेर गटातील लढत अधिकच रंगतदार बनली आहे.
अर्चना पाटील या मित्र संस्थेच्या उपाध्यक्ष तसेच भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील याच्या पत्नी असून त्यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी, गुरुवारी २२ जानेवारीला त्यांना पक्षाची उमेदवारी नाकारल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. घराणेशाहीला फाटा देत सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याचे चित्र त्यावेळी पुढे आले होते. मात्र त्याच कार्यकत्यांने अखेरीस उमेदवारी अर्ज मागे घेत अर्चना पाटील यांच्यासाठी जागा मोकळी करून दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे अर्चना पाटील यांनी तेर गटातूनच निवडणूक लढवावी, अशी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांची ठाम मागणी होती. अधिकृत उमेदवाराने माधार घेतल्याने या मागणीला यश मिळाले असून अर्चना पाटील यांची अपक्ष उमेदवारी आता भाजपाची अधिकृत उमेदवारी ठरली आहे. त्यांना कमळ हे पक्ष चिन्ह देण्यात आले आहे.
पळसप गटातून शिवसेनेकडून (शिंदे गट) नेताजी पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. नेताजी पाटील हे मूळचे भाजपाचे कार्यकर्ते असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला होता. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या प्रकरणावरून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला होता.
Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर
स्थानिक कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी भाजपाने शिवसेनेची ‘गेम’ केल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर नेताजी पाटील यांनी अखेरीस आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा असून, त्यांच्या जागी धाराशिव तालुकाप्रमुख तानाजी लाकाळ यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोन गटांमध्ये घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे धाराशिव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीची लक्षणीयरीत्या रंगत वाढली आहे.