
राजकीय वातावरण तापले! ५५ जिप गटात २३४ तर ११० पंस गणांतून ३९३ उमेदवार निवडणूक मैदानात
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद गटात एकूण २३४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यात १२० पुरुष तर ११४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात जिपच्या एकूण गटांची संख्या ५५ आहे. तर पंचायत समितीच्या ११० गणांतून ३९३ उमेदवार मैदानात आहेत. यात १९३ पुरुष तर २०० महिला उमेदवारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गटांच्या निवडणुकीसाठी ९६७ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यात ५४१ पुरुष आणि ४२६ महिला उमेदवारांचा समावेश होता. छाननी वेळी यातील २५ उमेदवारांच्या उमेदवाऱ्या रद्द (बाद) झाल्या होत्या. यात भूम तालुक्यातील एक, कळंब तालुक्यातील ४, धाराशिव तालुक्यातील १८, तुळजापूर तालुक्यातील एक आणि उमरगा तालुक्यातील एक असे २५ उमेदवारी अर्ज रद्द (बाद) झाले होते. उर्वरित ७६८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यात ४२२ पुरुष तर ३४६ महिला उमेदवारांचा समावेश होता. यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १३ जणांनी उमेदवारी मागे घेतली. यात ११ पुरुष २ महिला उमेदवारांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी २४ रोजी १३ जणांनी उमेदवारी मागे घेतली. यात ९ पुरुष आणि ४ महिला उमेदवारांचा समावेश होता. तर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४४८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली. यात २६१ पुरुष आणि १९४ महिला उमेदवारांचा समावेश होता.
तालुकानिहाय परंडा तालुक्यातून २२ पुरुष, १८ महिला असे एकूण ४० उमेदवारांनी, भूम तालुक्यातून १८ पुरुष, २५ महिला असे एकूण ४५, वाशी तालुक्यातून ७ पुरुष, ९ महिला असे एकूण १६, कळंब तालुक्यातून ४७ पुरुष, २२ महिला असे ६९, धाराशिव तालुक्यातून ८५ पुरुष ५० महिला असे १३५, तुळजापूर तालुक्यातून ४८ पुरुष, २४ महिला असे एकूण ६५, लोहारा तालुक्यातून २२ महिला आणि उमरगा तालुक्यातून ३४ पुरुष आणि २४ महिला उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते.
आता निवडणूक मैदानात असलेल्या उमेदवारांची तालुकानिहाय संख्या परंडा पुरुष १५, महिला १२, एकूण ३०, भूम पुरुष ८, महिला १६, एकूण २४, वाशी पुरुष ५, महिला १० एकूण १५, कळंब पुरुष १९, महिला १६, एकूण ३५, धाराशिव ३३ पुरुष, १६ महिला, एकूण ४९, तुळजापूर पुरुष १९, महिला १६, एकूण ३५, लोहारा महिला १५ आणि उमरगा तालुक्यातून १८ पुरुष, १३ महिला असे एकूण ३१ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.
तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या ११० गणांतून तालुकानिहाय परंडा पुरुष १९, महिला २४, एकूण ४३, भूम पुरुष १९, महिला २२, एकूण ४१, वाशी पुरुष १२, महिला १६, एकूण २८, कळंब पुरुष ३१, महिला २६, एकूण ५७, धाराशिव पुरुष ३९, महिला ३६, एकूण ७५, तुळजापूर पुरुष ३५, महिला ३१, एकूण ६६, लोहारा पुरुष ११, महिला १९, एकूण ३० आणि उमरगा तालुक्यातून पुरुष २७, महिला २६ असे एकूण ५३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.