
धीरेंद्र शास्त्रींकडून अखेर माफी! शिवरायांवरील विधानामुळे राज्यभरात संताप (Photo Credit- X)
आपल्या स्पष्टीकरणात धीरेंद्र शास्त्री यांनी नमूद केले की, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. ते म्हणाले, “ज्यांच्याकडून आपण ‘हिंदू राष्ट्रा’च्या संकल्पनेसाठी प्रेरणा घेतो, अशा महापुरुषाचा अपमान करण्याचा विचार माझ्या मनात स्वप्नातही येऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज हिंदुत्वाची विचारधारा टिकून आहे. तरीही, माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो.”
प्रत्येक सनातनी व्यक्तीच्या मनात महाराजांविषयी नितांत आदर असल्याचे सांगत शास्त्री पुढे म्हणाले की, शिवरायांच्या योगदानामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. समाजात कोणत्याही प्रकारचा कलह किंवा गैरसमज निर्माण होऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले.
यावेळी शास्त्री यांनी त्यांच्या एका जुन्या आणि चर्चेत असलेल्या विधानावरही भाष्य केले. कुटुंबात चार मुले असावीत आणि त्यातील एकाने संघासाठी (RSS) कार्य करावे, असे त्यांनी सुचवले होते. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “माझा उद्देश केवळ एवढाच होता की, प्रत्येक कुटुंबात किमान एक मूल तरी कट्टर राष्ट्रवादी आणि सनातनी आदर्शांचे पालन करणारे असावे. ते मूल पुढे जाऊन जिल्हाधिकारी होवो किंवा इतर कोणत्याही मोठ्या पदावर जावो, पण त्याच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत असावे, हीच माझी मूळ भावना होती.”
आपल्या विधानांचा चुकीचा अर्थ लावून समाजात तेढ निर्माण करू नये, असे आवाहन शास्त्री यांनी केले आहे. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले एका मोहिमेनंतर शिवाजी महाराज थकले होते आणि ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवत आपण थकलो असून आता राज्यकारभार सांभाळावा, अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी ती मान्य केल्याचे सांगितले.त्यांनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरु’ असे सांगत पुन्हा मुकुट शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.