मुंबई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) सिल्व्हर ओकवर (Silver Oak) दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहमंत्री यांच्यामध्ये राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत (Law And Order) बैठकीत चर्चा झाली. एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) उद्या मुंबईत येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपल्या बाजुने ४० पेक्षा अधिक आमदार वळवले आहेत. त्यांना अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. मागील नऊ दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. शिंदे हे सदर आमदारांना घेऊन अगोदर सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच भाजपने बहुमत सिद्ध करण्याची मागणी केल्याने राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र दिले आहे.
त्यामुळे भाजपचे आमदार मुंबईत दाखल होत असून एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत उद्या मुंबईला पोहोचणार आहेत. महाविकास आघाडीनेही आमदारांची जमवाजमव सुरु केली असून राज्यात कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृहमंत्र्यांनी आढावा घेतला.