संजय पाटलांना घरवापसीचे वेध? मुख्यमंत्र्यांशी भेटी-गाठी वाढल्या; समर्थकांकडून...
तासगाव : विधानसभा निवडणुकीत भाजपशी काडीमोड घेत चिरंजीवाचे तिकीट डावलून स्वत: मैदानात उतरलेले माजी खासदार संजय पाटील यांना पराभवानंतर भाजपात परतीचे वेध लागले आहेत, अशा जोरदार चर्चा मतदारसंघात खास करुन त्यांच्या समर्थकांत सुरु झाली आहे. यासाठी त्यांनी तीन ते चार वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानात संजय पाटील यांच्या कट्टर समर्थकांनी खुलेआम सहभाग घेतल्याने संजय पाटील आता अजितदादांना बाय-बाय करणार अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत.
२०१४ व २०१९ असे दोनदा भाजपमधून खासदार झाले. २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. पक्षांतर्गत कुरघोड्या जिल्हाध्यक्षापासून अनेक तत्कालीन मंत्री व आमदार यांना संजय पाटील यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळात शिंगावर घेतले होते. पक्षांतर्गत अनेकांबरोबर त्यांचे वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे सर्वांनी मिळून पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. त्यांचा लाखाच्या फरकाने पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच पुन्हा शड्डू ठोकला. आबांचा मुलगा रोहितसमोर आपला चिरंजीव प्रभाकर याचा टिकाव लागणार नाही, याची जाणीव पाटील यांना होती. गटाचे अस्तित्व टिकवण्यासाठी कोणीतरी लढायला हवे त्यामुळे अखेर त्यांनी स्वतःच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
ते कसले पैलवान..
सलग तीनवेळा लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भाजपाला सोडचिट्टी देत संजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार गटात प्रवेश करून ‘घड्याळ तेच वेळ नवी’ म्हणत नव्या ‘इनिंग’ला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाला ‘चावी’ दिली. रोहित पाटील यांच्यासमोर तगडे ‘आव्हान’ उभे केले. संजय पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती. तर रोहित पाटलांसाठी ती प्रतिष्ठेची ठरली. लोकसभेला माजी खासदारांच्या विरोधात असणाऱ्या माजी मंत्री अजित घोरपडे यांच्याशी पाटील यांनी समझोता करत निवडणुकीत चूरस निर्माण केली. दोन्ही गटाकडून निवडणुकीत टोकाचे प्रयत्न करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांना चितपट केले. कोरोना काळात संजय पाटील यांनी जोर – बैठका मारल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला होता, ते कसलेले पैलवान आहेत, असे चित्र निर्माण केले होते. तर निवडणुकीत त्यांनी रोहित याला मी ‘आव्हान’ मानत नाही, ते अजून ‘बाळ’ आहे, असे म्हणून हिणवले. याच पैलवानाला धूळ चारण्याचे काम रोहित पाटील या बाळाने केले.
कार्यकर्त्यांची अवस्था ‘फिरत्या रंगमंचा’सारखी
संजय पाटील यांच्यासह त्यांचा संपूर्ण गट गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अस्वस्थ आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अजित पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सपाटील व कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपचे वेध लागले आहेत. पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर अद्याप भाजपमध्ये आहेत. तासगाव – कवठेमहांकाळचे निवडणूक प्रमुख आहेत. भाजपची सध्या सदस्य नोंदणी सुरू आहे. सुरुवातीच्या काळात प्रभाकर पाटील अथवा त्यांचे कार्यकर्ते कुठेही सदस्य नोंदणीमध्ये दिसून आले नाहीत. मात्र ज्यावेळी भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते सदस्य नोंदणी करू लागले. एकीकडे संजय पाटील अद्याप राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय नियमाप्रमाणे राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे त्यांचा चिरंजीव भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या बापलेकांच्या या राजकारणात कार्यकर्त्यांची अवस्था मात्र ‘फिरत्या रंगमंचा’ सारखी झाली आहे. त्यांना ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ हेच समजेना झाले आहे.
भाजपमध्येच परतावे असा कार्यकर्त्यांचा नेत्यांसमोर आग्रह
संजय पाटील यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसासाठी विविध वृत्तपत्रांमधून तसेच बॅनरच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. बहुतांशी जाहिरातींवरून अजित पवार यांचे फोटो गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे संजय पाटीलही गेल्या अनेक दिवसांपासून द्विधा मनस्थितीत असल्याचे स्पष्टपणे दिसते. या सर्व घडामोडी पाहता संजय पाटील घरवापसीच्या तयारीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार संजय पाटील यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय पाटील यांनी भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. संजय पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आपण भाजपमध्येच परतावे असा आग्रह नेत्यांसमोर बोलून दाखवला आहे.