
श्वानांचे निर्बिजीकरण कागदावरच! शहरात ३० हजारांवर मोकाट श्वान; दररोज सरासरी १० जणांना चावा
Amravati News: अमरावती शहरातील मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव आणि श्वानदंशाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ३० हजारांहून अधिक मोकाट श्वान असल्याचा अंदाज असताना त्यांच्या निर्बिजीकरणाची प्रक्रिया मात्र पुन्हा कागदोपत्रीच अडकली आहे. तब्बल ५० लाख रुपयांच्या निधीतून ३ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खो बसला आहे. विशेष म्हणजे, चौथ्यांदा राबविण्यात आलेल्या या निविदा प्रक्रियेला केवळ एका कंत्राटदाराने प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.
शहरातील विविध वस्त्या, बाजारपेठा, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरात मोकाट श्वानांचे कळप दिसून येतात. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांकडून पालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती देण्याची गरज आहे.
महापालिकेने मार्च २०२७ पर्यंत ३ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पूर्ण झाली होती. २८ सप्टेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार होती; मात्र आचारसंहितेमुळे ती उघडता आली नाही. शहरातील श्वानांची अंदाजित संख्या आणि प्रस्तावित निर्बीजीकरणाचे प्रमाण पाहता या मोहिमेचा प्रत्यक्ष परिणाम किती होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वीच्या कंत्राटदारामार्फत दोन हजारांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराची २०२५ मधील देयके अद्याप थकीत असल्याचे समजते. त्यामुळे जुन्या कंत्राटाची देयके प्रलंबित असताना नव्या कंत्राटाची प्रक्रिया का राबविण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
श्वान उत्पत्ती नियंत्रण कार्यक्रमांतर्गत यापूर्वी तीनवेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. आता चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, यावेळी एकाच कंत्राटदाराने निविदा दाखल केल्याची माहिती आहे. संबंधित कंत्राटदाराची कागदपत्रे आणि पात्रता तपासल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कंत्राटदाराला असली, तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
श्वानांची अंदाजित संख्या: ३० हजारांहून अधिक
नवीन निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट: ३ हजार श्वान
निवी: ५० लाख रुपये
निविदा प्रक्रिया: चौथ्यांदा
निविदेला प्रतिसाद एक कंत्राटदार
कामाची मुदत : मार्च २०२७ पर्यंत
प्रमुख समस्या: श्वानदंश, संथ निर्बीजीकरण आणि थकीत देयके.