
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली
दौंड तालुक्यात तापले राजकीय वातावरण
खडकी–देऊळगाव राजेमध्ये चुरस वाढली
यवत: दौंड तालुक्यातील खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तीन तुल्यबळ नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या गटातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः डॉ. हर्षदा काळे यांनी माघार न घेतल्यास या लढतीत प्रचंड चुरस वाढणार, अशी चर्चा आज पहिल्याच दिवशी तालुक्यातील वाडी-वस्तीपर्यंत सुरू झाली आहे.
दौंड तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सात गट असून, त्यामधील सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची लढत खडकी–देऊळगाव राजे गटात होणार असल्याचे स्पष्ट चित्र आजच समोर आले आहे. 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या गटातून भाजपचे ज्येष्ठ व मान्यवर नेते वासुदेव नाना काळे यांची कन्या डॉ. हर्षदा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील दौंड तालुक्यातील ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर अर्ज भरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले, अनुभवी व प्रभावशाली नेते बाबा जगदाळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
डॉ. हर्षदा काळे यांच्या कर्तृत्वामुळे तालुक्यात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली असून, वासुदेव नाना काळे हे भाजपचे संस्थापक कार्यकर्ते असताना देखील भाजपने ‘आयाराम’ उमेदवाराला तिकीट दिल्याने काळे कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र होत आहे. ही भावना आजच उघडपणे चर्चेचा विषय बनली आहे. तालुक्यातील दोन मातब्बर नेत्यांसमोर नवख्या असल्या तरी डॉ. हर्षदा काळे यांनी धाडसाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही लढत अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने डॉ. काळे यांच्यावर अन्याय केल्याची स्पष्ट चर्चा असून, याविरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे.
या गटात भाजपचे आप्पासाहेब पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे उमेदवार माघार घेणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे. “वासुदेव नाना काळे यांनी आता स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा गप्प बसावे. डॉ. हर्षदा काळे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे,” अशा प्रतिक्रिया डॉ. काळे यांच्या अर्ज भरण्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. एकूणच राजकीय पार्श्वभूमी आणि काळे कुटुंबाचे जनसामान्यांशी असलेले घनिष्ठ संबंध पाहता, सध्या तरी या गटात डॉ. हर्षदा काळे यांनी चांगली हवा निर्माण केली असल्याचे चित्र आहे.
लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट
वासुदेव काळे हे दौंड तालुक्यातील भाजपचे संस्थापक कार्यकर्ते आहेत. त्यांनी तालुक्यात भाजप संघटना जिवंत ठेवत ती वाढवली. तालुक्याच्या पूर्व भागात त्यांचे प्रभावी वर्चस्व आहे. याच खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटात त्यांनी एकेकाळी दौंडचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती कै. नानासाहेब पवार आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी सभापती कै. विलासराव जाधव या दोन मातब्बर नेत्यांचा दणदणीत पराभव करत जिल्हा परिषद निवडणूक जिंकली होती. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आता डॉ. हर्षदा काळे यांना मिळाली असून, त्या नवा इतिहास घडवतील, अशी चर्चा आजपासून सुरू झाली आहे.