मुंबई – भाजपच्या विविध राष्ट्रीय पदांवर आणि नंतर आमदार असताना आपल्या भाषणातून, आपल्या कार्यातून लोकांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. कांता नलावडे या येणाऱ्या काळात साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. राजकारण क्षणभंगुर तर साहित्य शाश्वत असते, असेही ते म्हणाले.
माजी आमदार डॉ. कांता नलावडे यांच्या “भरारी” कवितासंग्रहाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ लेखक डॉ.शिरीष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, अनेकदा कथासंग्रह, कादंबरी यांना अनेक प्रकाशन संस्था मिळतात. काव्यसंग्रह प्रकाशित करण्यास ग्रंथाली प्रकाशन संस्थेने नफा तोट्याचा विचार न करता काव्यसंग्रह प्रकाशित केला, याचे कौतुक वाटते. मला विश्वास वाटतो की, कांता नलावडे यांचे २५ वे पुस्तकही प्रकाशन करण्याचे भाग्य मला मिळेल.
राजकरणात सक्रिय असताना कांता नलावडे या कार्यकर्त्या म्हणून आम्हाला माहित होत्या पण आता त्या कवयित्री म्हणून आपल्यासमोर आल्या असून ही त्यांची नवी ओळख सुद्धा आनंदाची वाटते. मला आनंद वाटतो की, कांताताई यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सहवास मिळाला आणि त्यामुळे त्यांची कवितांची ओळख अधिक गडद झाली, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.