Solapur News: उजनीचे पाणी बिघडवतंय सोलापूरकरांचे आरोग्य; जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह यांचा दावा काय?
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. पुणे जिल्ह्यातील येणाऱ्या सांडपाण्यामुळे उजनी धरणातील ११७ टीएमसी पाणी प्रदूषित होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे सोलापूरच्या लोकांचे आरोग्य बिघडत आहे. लोकांच्या कामाची क्षमता कमी होत आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे, असा आरोप जागतिक जलतज्ञ, जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह यांनी केला.
सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या जागतिक जलतज्ञ, जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह यांनी उजनी धरणाची पाहणी केली. यानंतर त्यांनी सोलापुरात श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी उजनी धरणातील पाण्याचे प्रदूषण, सिद्धेश्वर मंदिर तलावातील पाण्याची स्थिती, देशभरातील नदी स्वच्छता मोहीम या विषयावर भाष्य केले. पत्रकार परिषदेस जल बिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुघ, सत्यनारायण बोलीसेटी, अंकुश नारायणकर, रिठा राॅडरिक्स, सुनिल रहाणे, रमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, उजनी धरणातील पाण्यासंदर्भात विविध सहा समित्या गठीत करण्यात येत आहेत. या माध्यमातून या धरणातील जलप्रदूषणासंदर्भात जनजागृती उपाययोजना आणि पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. जल साक्षरता मोहीम राबविण्यात येणार आहे. उजनी धरणातील पाणी प्रदूषण होते या संदर्भात लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारला पाहिजे. येथील पाण्याच्या शुद्धते संदर्भात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाणी हे तीर्थ आहे, ते शुद्ध असायला हवे. याची जबाबदारी सर्व पदाधिकारी आणि लोकांचीही आहे. उजनी जलाशियातील प्रदूषित पाण्यामुळे होणारे गंभिर आजार यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आपल्या उजनी तलावातील पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील येणारे गटाराचे पाणी मुळा मुठा नदीमार्फत भीमा नदीपासून संपूर्ण जलाशयाला प्रदूषित करीत आहे.
नैनितालमध्ये जाऊन मंदिर समितीने अभ्यास करण्याची गरज
जागतिक जलतज्ञ, जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर तलावाचीही पाहणी केली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले. या तलावात घाण पाणी कुठून येते? मासे का मरतात? याचा शोध घेतला पाहिजे. तलावात कोण घाण करते? हे पाहायला हवे. मंदिर समिती आणि महापालिकेने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. तलावातील पाण्यातील ऑक्सिडेशन कमी होत आहे. ते वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी नैनितालमध्ये जाऊन मंदिर समितीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर येथील पाणी घाण होऊ नये ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
नागरिकांनी लढा उभारणे गरजेचे
डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी सर्व पाणी प्रक्रिया करून परत रिसायकल केले पाहिजे, परंतु पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी शुद्धीकरणापेक्षा नोटिफिकेशनला प्राथमिकता देत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोणत्याही प्रकारचे सांडपाणी नदीत पात्रात सोडणे बंद केले पाहिजे. या संदर्भात सोलापूर भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात लढा उभारणे गरजेचे आहे. दरम्यान, पेपर मिलच्या माध्यमातून खूप प्रदूषण होत आहे. बारामती ॲग्रो इंडस्ट्रीजने कंपनीकडून घाण पाणी सोडण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले.
नद्या स्वच्छतेच्या नावावर घोटाळे होत आहेत
देशात नद्या स्वच्छता करण्याच्या नावावर घोटाळे होत आहेत. नदीचे प्रदूषण रोखणे आवश्यक असताना केवळ सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून घाट वगैरे बांधले जात आहेत. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. यामुळे नदीपात्र कमी होत आहे. ते चुकीचे आहे. यामुळे नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. स्वच्छतेच्या नावावर सरकार नदीचे आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप डॉ. राजेंद्रसिंह यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय नदीपाणी कराराचे ३० वर्षांनी नूतनीकरण आवश्यक
भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले आहे या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, या पाणी कराराला ६० वर्षे झाली आहेत. वास्तविक पाहता दर ३० वर्षांनी अशा करारांचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. ते झाले नाही. साठ वर्षात भारताने वॉटर बँक बनवली पाहिजे होती, असे जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.