
Due to the war hotel, dhaba, and restaurant operators facing inconvenience for commercial LPG gas
Nanded News : नांदेड : मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध चर्चांना उधाण आले असून त्याचा परिणाम गॅस पुरवठ्यावरही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः व्यावसायिक गॅस सिलिंडरचा (LPG Gas) पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह अनेक छोट्या व्यावसायिकांची मोठी पंचाईत झाली आहे. स्थानिक गॅस एजन्सींना मागील काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमितपणे होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हॉटेल, ढाबे, खानावळी, चहाचे स्टॉल तसेच लहान खाद्य व्यवसाय चालविणाऱ्या व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.(Nanded News)
काही ठिकाणी गॅसअभावी कामकाजावर परिणाम होत असून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, गॅस तुटवड्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने काही नागरिकांकडून घरगुती गॅससह इतर आवश्यक वस्तूंची
आगाऊ साठवणूक केली जात असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांकडून दिली जात आहे. गॅसचा पुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले आहे.
हे देखील वाचा : ”नाल्यातून गॅस निर्मिती अन् पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग…! गॅस तुटवड्यावरुन खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तुर्तास बंद
व्यावसायिक गॅस सिलीडरचा पुरवठा बंद करण्याबाबत राज्य किवा केंद्र सरकारचा लेखी आदेश अद्यापपर्यंत आलेला नाही, सध्यस्थितीत व्यावसायिक सिलीडरचा पुरवठा बंद आहे, गॅस पुरवठा कधी सुरळीत होईल, याबाबत पुरवठा विभागाकडे कोणतीही माहिती नसून गॅस कंपनीच्या विक्री अधिका-यांकडे ही माहिती उपलब्ध असते, अशी प्रतिक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी व्यक्त केली.
स्टॉक किती दिवस पुरेल सांगता येत नाही
हॉटेल दूर्वाकुरचे मालक म्हणाले की, सध्या अनेक अडचणी सुरू आहेत. या परिस्थितीतून मी स्वतःही जात आहे. सध्या उपलब्ध असलेल्या स्टॉकवरच काम सुरू ठेवले आहे. मात्र हा स्टॉक नेमका किती दिवस पुरेल किंवा कधी संपेल, याबाबत निश्चितपणे काही सांगता येत नाही.
हे देखील वाचा : युद्धाचा सर्वसामान्यांना फटका! मावळमध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या भरऊन्हात लांबच रांगा
तातडीने गॅसपुरवठा करा
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सध्या यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती नसून प्रत्येक गॅस कंपनीच्या विक्री अधिका-यांकडूनच याबाबतची अचूक माहिती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून कृत्रिम तुटवडा किया साठेबाजी होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.