
प्रदूषणाला आळा कसा बसणार (फोटो सौजन्य - iStock)
थंडीमुळे व वायू प्रदूषणामुळे हवेतील धुरके वाढले असून ते कमी होण्यासाठी सतर्कता राखत ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज विशद करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शहरात सुरु असलेल्या बांधकाम साईट्सवर धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपरणे राबविल्या जात असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी व त्यामध्ये त्रुटी आढळल्यास साईटवरील बांधकाम आठवडयाभरासाठी बंद करावे असे निर्देश दिले. याकरिता नगररचना विभाग व विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी आपापल्या क्षेत्रातील बांधकाम साईट्सवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व त्याचा अहवाल जलद सादर करावा असे निर्देशित केले.
हवेतील प्रदूषणाचा त्रास
सध्या वारा वाहण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने हवेतील धुरके वाढले असून त्यावर नियंत्रणासाठी मुख्य रहदारीचे रस्ते व एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते याठिकाणी रस्त्यांच्या कडेला असलेली माती वाहनांच्या वेगामुळे हवेत उडून धुळीचे प्रमाण वाढते हे लक्षात घेत ती साफ करावी व उचलून नेण्याची धडक मोहीम राबवावी असेही निर्देशित केले. अशाप्रकारे रस्त्यांच्या कडेची माती साफ करण्याची प्रक्रिया दर 15 दिवसांनी राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
राज्यातील सर्व शहरांमध्ये धूलिकण मर्यादा ओलांडली; वायू गुणवत्ता ‘मानकां’ पेक्षा अधिक
आयुक्तांचे निर्देश
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादीबाबत आलेल्या हरकती व सूचना तपासण्याचे काम विहीत वेळेत बारकाईने करावे असे निर्देश देतानाच दुबार नावांबाबतची मोहीम अतिरिक्त मनुष्यबळ वापरून काळजीपूर्वक पूर्ण करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. त्यासोबतच मतदान केंद्रांच्या जागांची पाहणी करावी आणि तेथील आवश्यक सेवासुविधा पूर्ततेचे नियोजन करावे.
त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाकरिता निवडणूक केंद्राच्या संभाव्य जागांची पाहणी करुन त्या निश्चित कराव्यात व त्या जागा निवडणूक कामासाठी अधिग्रहीत करावयाच्या असल्याने त्या कौटुंबिक, सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षित करता येणार नाहीत असे जाहीर करावे, जेणेकरुन नागरिकांना त्याबाबत माहिती मिळेल व त्यांना या जागा वगळून आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करता येईल अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.