Maharashtra monsoon Delay: अरबी समुद्रात पाऊस रेंगाळल्याने राज्यात उष्णतेचा कहर;राज्यासाठी धोक्याची घंटा
Maharashtra monsoon Delay: जून महिना उजाडून आज १५ दिवस उलटून गेले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. १५ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पण मान्सुन अरबी समुद्रातच रेंगाळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उष्णताही सतत वाढत चालली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून प्रशांत महासागरात अल निनो सक्रीय झाल्याने चिंता वाढली आहे. मान्सून रेंगाळल्याने राज्यात दिवसेंदिवस उष्णता वाढच चालली आहे. आज भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशाराही दिल्याने पुढचे काही दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार असल्याचेही बोलले जात आहे.
अल निनोमुळे हवामान तज्ज्ञांनी जोपर्यंत आवाहन केले जात नाही, तोपर्यंत पेरण्या न करण्याचा इशारा शेतकऱ्यांना देण्यात आला. तसेच, हवामान विभागाने यंदाचा पाऊस कमी राहण्याचा अंदाज वर्तवला असून मान्सूनचा पाऊस रेंगाळ्याने उष्णता वाढत चालली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासाठी धोक्याचे राहणार आहेत.
राज्यातील नागरिक आणि शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असून, मान्सूनच्या प्रगतीला मात्रमोठा ब्रेक लागला आहे. बंगालच्या उपसागरातून मान्सून तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारकडे पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. पण अरबी समुद्रातील त्याची वाटचाल गेल्या आठवडाभरापासून पूर्णपणे मंदावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती चिंताजनक असून पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा आणि बिहारमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अरबी समुद्रातील स्थितीत सुधारणा न झाल्यास महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास आणखी विलंब होऊ शकतो.
“पुढील दोन ते तीन दिवसही मान्सूनची स्थिती अरबी समुद्रात कायम राहिली, तर जून महिना बहुतांश कोरडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.” असही तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच, सध्या २० जूनच्या आसपास मान्सून राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी त्याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरण्या करू नयेत, असेआवाहन केले आहे. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्याशिवाय पेरणी टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या प्रतीक्षेच्या भूमिकेत आहेत.
आज कोकण आणि विदर्भातील काही भागांत उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून, कोकणातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्वमोसमी स्वरूपाचा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मान्सूनचीही मंदावलेली स्थिती राज्यातील शेती, पाणीसाठे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक मानली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील हवामानातील बदलांकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.






