आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी (फोटो- ani)
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केले आहे. आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन करणारच असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान काल मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावार आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. मात्र आता पोलिसांनी जरांगे पाटील यांना अटी-शर्तीसह परवानगी दिली आहे.
पोलिसांनी आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र केवळ एका दिवसासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये अनेक अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसच आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पाच हजार आंदोलकाना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आंदोलनासाठी अटीशर्ती काय?
1. आंदोलन करण्यासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.
2. आंदोलकांची संख्या 5 हजार असणे आवश्यक आहे.
3. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा वापरता येणार नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या रविवारच्या पत्रकार परिषदेनंतर चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली. तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर ज्या पद्धतीने भाष्य करण्यात आले ते महाराष्ट्राला पटणारे नाही. आम्हाला तुमचा देखील आदर आहे. जरांगे पाटील हे समाजाच्या आरक्षणासाठी काम करत आहात. हे आरक्षण जर कोण देणार तर, ते देवेंद्र फडणवीसच देणार. मात्र आशा पद्धतीने त्यांच्या आईवर टीका केली गेली नाही,हे कोणीही खपवून घेणार नाही. त्यांनी त्यांचे शब्द मागे घेतले, त्याबाबत त्यांचे स्वागत आहे.
जरांगे पाटील यांनी माझ्यावर टीका केली. गबाळ उचकीन असे म्हणाले. मात्र मी त्यांना घाबरणारी नाही. माझ नाव चित्रा वाघ आहे. मी गेली 27 वर्षे राजकारणात, समाजकारणात काम करत आहे. माझ काय गबाळ उचकायच ते उचका. मी त्यांना घाबरणारी नाही. मी माझे काम करतच राहणार.